नाणेघाटात पर्यटकांची गर्दी वाढली   

बेल्हे, (वार्ताहर) : पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या जुन्नरच्या पश्चिम आदिवासी भागात, निसर्गरम्य धबधबे, रिव्हर्स वॉटरफॉल (उरफाटा धबधबा), ऐतिहासिक शिलालेख, किल्ले जीवधन व घाटमाथ्यावर जाणारी जुनी पायवाट यांसारख्या आकर्षणांनी पर्यटकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
 
राज्य सरकारने जुन्नर तालुक्याची पहिला पर्यटन तालुका म्हणून घोषणा केल्यानंतर या भागातील पर्यटनाला नवे उभारी मिळाली आहे. विशेषतः पावसाळ्यात नाणेघाट आणि परिसरातील विविध ठिकाणी पर्यटकांची लक्षणीय वाढ झाली आहे. राज्य तसेच परराज्यातील विविध भागांमधून पर्यटक येथे वर्षाविहारासाठी येत असून, नुकत्याच झालेल्या शनिवार-रविवारच्या सुट्ट्यांमध्ये येथे मोठी गर्दी पहावयास मिळाली. या पर्यटनस्थळावर स्थानिक ग्रामस्थांना प्रशिक्षण देऊन गाईड म्हणून कार्यरत केले गेले आहे. त्यामुळे पर्यटकांना अधिक माहितीपूर्ण अनुभव मिळतो आहे. दरम्यान, प्रशासनाकडून पर्यटकांना निसर्गाचा आनंद सुरक्षितरीत्या घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्थानिक ग्रामस्थही पर्यटकांनी गैरवर्तन टाळावे आणि परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवर्जून सांगत आहेत.

Related Articles