व्याकरणाला भाषा विज्ञानाची जोड हवी   

प्रा. यास्मिन शेख यांचे प्रतिपादन; १०१ व्या वर्षात पदार्पण 

पुणे : व्याकरणाला भाषा विज्ञानाची जोड दिल्याशिवाय व्याकरण समजणार नाही; विद्यार्थ्यांना व्याकरणाची गोडी लागणार नाही, असे मत सुप्रसिद्ध व्याकरणतज्ज्ञ प्रा. यास्मिन शेख यांनी व्यक्त केले. 
 
प्रा. यास्मिन शेख यांनी शनिवारी वयाची शंभरी पार केली. त्या निमित्त प्रा. शेख यांच्या कन्या रूपा बावीस्कर, दिलीप फलटणकर आणि अंर्तनादचे भानू काळे यांनी त्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. त्या वेळी प्रा. शेख सत्काराला उत्तर देताना बोलत होत्या. सेनापती बापट रस्त्यावरील महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या कार्यालयात सुहृदांच्या उपस्थितीत सत्कार सोहळा झाला.
 
प्रा. शेख म्हणाल्या, धर्माने ज्यू असूनही घरात मराठी भाषेतील मुबलक पुस्तके होती. त्यामुळे मराठी भाषेतील साहित्य वाचनाची गोडी लागली. महाविद्यालयीन आयुष्यात माटे, वाटवे यांच्यासारखे शिक्षक मिळाल्याने मराठी भाषा, व्याकरणाची गोडी वाढतच गेली. मराठीच्या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक कधी सोडला नाही. मुस्लिम मुलाशी विवाह करण्यास वडिलांचा विरोध होता, पण विवाहासाठी सासरच्या लोकांनी पुढाकार घेतला. लग्न झाल्यानंतर आपल्या दोन्ही मुलींचे त्यांनी खूप लाड केले. त्यांना एकदा कडकडून मिठी मारल्यानंतर त्यांचा माझ्यावरील राग गेला. आदर्श पिता म्हणजे काय याचा अनुभव घेतला असल्याने आपल्या आयुष्यातील वडिलांचे स्थान खूप मोठे आहे,असेही त्या म्हणाल्या. वडिल आणि दोन्ही मुलींच्या मिळालेल्या सहकार्यामुळे कृतज्ञ असल्याची भावना प्रा. शेख यांनी व्यक्त केली.
 
प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, मराठी भाषेच्या उत्कर्षाची आस बाळगून आणि व्याकरणाचा ध्यास घेऊन प्रा. शेख यांनी जे काम केले आहे ते पुढच्या अनेक पिढ्यांना उपयुक्त ठरणार आहे. वर्ग आणि अध्यापन एवढ्यापुरते आपले काम मर्यादित न ठेवता त्यांनी आपल्या कामातून समाजाला भाषाभान दिले. व्याकरणासारखा रुक्ष आणि क्लिष्ट वाटणारा विषय त्यांनी ललितरम्य पद्धतीने सर्वांना शिकवला. शतकपूर्ती केलेली ही विदुषी मराठीचे वैभव आहे. भानू काळे, दिलीप फलटणकर यांनी मनोगत व्यक्त केले. वर्षा काळे यांनी सूत्रसंचालन केले.

Related Articles