हिंदी सक्तीचा हट्ट सरकारने सोडावा : पवार   

सातारा, (प्रतिनिधी) : हिंदी भाषेची सक्ती करू नये, असा सगळ्यांचा आग्रह आहे; पण हिंदी भाषिक वर्ग देशात मोठा असल्याने या भाषेला नाकारूनही चालणार नाही. त्यामुळे पाचवीनंतर हिंदी शिकण्यास काहीही हरकत नाही. मुले ही भाषा किती आत्मसात करतात, त्यावर सर्व काही अवलंबून असल्यामुळे सरकारने प्राथमिक शाळेत हिंदी भाषा सक्तीचा हट्ट सोडावा. कारण, मातृभाषाही महत्त्वाची आहे, हे लक्षात घ्यावे. पाचवीनंतर मुलाला हिंदी भाषा ठेवायची की नाही, याचा निर्णय कुटुंबातील लोक घेतील, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार यांनी महायुती सरकारला दिला आहे.
 
दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक एकत्र लढण्याच्या निर्णयासाठी महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक येत्या ३० जूनला होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. 
 
रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमानिमित्त शरद पवार शुक्रवारी सातार्‍यात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांच्या समवेत आमदार शशिकांत शिंदे होते.हिंदी भाषेला विरोध होत असून, राज ठाकरे व उद्धव ठाकरे आंदोलन करणार आहेत, या आंदोलनात तुम्ही सहभागी होणार का? असे विचारले असता ते म्हणाले, हिंदी सक्तीचा हट्ट सरकारने सोडावा. निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी एकत्र बसून निर्णय घेण्याचे ठरविले. येत्या ३० जूनला बैठक होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये निर्णय घेतला जाईल. 
 
माळेगाव कारखान्यातील विजयाबद्दल केलेल्या जल्लोषावर ते म्हणाले, आजपर्यंत ज्यांच्या हातात हा कारखाना होता, त्यांच्याच हातात राहिला आहे, त्यामुळे वेगळे काहीही झालेले नाही. इराण, इस्रायल युद्धाचे आपल्या देशावर आर्थिक परिणाम काय होतील? या प्रश्नावर ते म्हणाले, इराणवर हल्ल्याची सुरुवात इस्रायलकडून झाली. 
 
इराणला दुखावणे भारताच्या दृष्टीने योग्य नाही. इस्रायल हा शेतीमध्ये अग्रेसर असून, तेथे अनेक संशोधने सुरू आहेत. ज्यावेळेस एखादा देश दुसर्‍या देशावर हल्ले करतो, कटुता निर्माण करतो, ते बरोबर नाही. त्याबाबत भारतातील आताचे राज्यकर्ते स्पष्ट भूमिका घेत नाहीत; पण आता त्यांना निर्णय घ्यावा लागेल.
 

Related Articles