पुणेकरांनी घेतला नाट्यगीतांचा आस्वाद   

पुणे : बालगंधर्व यांच्या १३७ व्या जयंतीनिमित्त आयोजित ’नाट्यशृंगार’ या नाट्यगीतांच्या मैफिलीचा आस्वाद पुणेकर रसिकांनी घेतला. इतर नाट्यपदांनाही रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली.  
 
संगीत नाटक क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी करणार्‍या बालगंधर्व संगीत रसिक मंडळातर्फे रविवारी भरत नाट्यमंदिरात झालेल्या या मैफलीत शृंगार रसावर आधारित नव्या आणि जुन्या संगीत नाटकांमधील रंगतदार पदांचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये ज्येष्ठ संगीत नाटक रंगकर्मी गायक सुरेश साखवळकर, गायिका बकुल पंडित, गायक रविंद्र कुलकर्णी, गायिका अस्मिता चिंचाळकर, गायक चिन्मय जोगळेकर, गायिका संपदा थिटे आणि गायक केदार केळकर यांनी सादर केलेल्या नाट्यपदांना रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली.  
 
या मैफलीचा प्रारंभ केदार केळकर यांनी सादर केलेल्या ’सौभद्र’ या नाटकातील ’प्रिये पहा’ या लोकप्रिय नाट्यगीताने झाला. यानंतर त्यांनी ’सुवर्णतुला नाटकातील ’रतिहुनि सुंदर’ हे नाट्यगीत सादर केले. संपदा थिटे यांनी  ’सुवर्णतुला’ या नाटकातील ’अंगणी पारिजात फुलला’ आणि ’मदनाची मंजिरी’ या नाटकातील ’ये मौसम है रंगीन’ ही नाट्यपदे सादर करून रसिकांना संगीत रंगभूमीच्या सुवर्णकाळाचे स्मरण करून दिले. चिन्मय जोगळेकर यांनी ’मत्स्यगंधा’ या नाटकातील ’नको विसरू संकेत मीलनाचा’ आणि ’मदनाची मंजिरी’ या नाटकातील ’आली प्रणय चंद्रिका करी’ ही नाट्यपदे, तर अस्मिता चिंचाळकर यांनी ’मानपमान’ या नाटकातील ’नाही मी बोलत नाथा’ आणि ’मदनाची मंजिरी’ या नाटकातील ’अंग अंग तव अनंग’ ही नाट्यपदे सादर केली. 
 
रविंद्र कुलकर्णी यांनी सादर केलेले ’मंदारमाला’ या नाटकातील ’ओ गुलबदन’ हे वैशिष्ट्यपूर्ण नाट्यपद आणि ’स्वर सम्राज्ञी’ या नाटकातील ’टुमदार कुणाची छान’ हे नाट्यपद रसिकांची दाद घेऊन गेले. बकुल पंडित यांनी ’पाणीग्रहण’ या नाटकातील ’प्रीति सुरी दुधारी’ आणि ’मृच्छकटिक’ या नाटकातील ’माडीवरी चल ग गडे’  नाट्यगीत सादर केले. 
 
सुरेश साखवळकर यांनी सादर केलेल्या ’देवमाणूस’ या नाटकातील ’चांद माझा हा हासरा’ आणि ’कान्होपात्रा’ या नाटकातील ’अगा वैकुंठीच्या राया’ या नाट्यगीतांनी या मैफलीचा समारोप झाला. या गायक कलाकारांना ऑर्गनवर हिमांशु जोशी,  तबल्यावर केदार कुलकर्णी आणि व्हायोलीनवर प्रज्ञा देसाई - शेवड यांनी साथसंगत केली. या सुरेल मैफलीचे अनुराधा राजहंस यांनी अभ्यासपूर्ण निवेदन केले. तर नाना कुलकर्णी यांनी व्यवस्थापन केले.

Related Articles