पालखी मार्गावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांची तपासणी   

एफडीएचे पथक तैनात 

पुणे : पालखी सोहळ्यात दरवर्षी लाखो वारकरी सहभागी होतात. वारकर्‍यांना स्वच्छ आणि चांगले खाद्यपदार्थ मिळावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. पालखी मार्गांवर खाद्यपदार्थ तपासणीसाठी पथके तैनात करण्यात आली असून या पथकांनी रस्त्यांवरील खाद्यपदार्थांच्या गाड्या आणि हॉटेलांची तपासणी सुरू केली आहे. 
   
पावसाळा दरम्यान हा सोहळा येत असल्यामुळे खाद्यपदार्थ दूषित होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे अन्नातून विषबाधा होण्याचा धोका वाढतो. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने तपासणीसाठी तीन पथके नियुक्त केली आहेत. यातील प्रत्येक पथकांमध्ये सहा अधिकार्‍यांचा समावेश आहे. ही पथके पालखी मार्गावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांची तपासणी करीत आहेत. त्यात खाद्यपदार्थ बनविताना स्वच्छता बाळगण्यात येत आहे का, याची तपासणी देखील केली जात आहे. याचबरोबर खाद्यपदार्थांचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येत आहेत.
  
वारीच्या मुक्कामाच्या ठिकाणी अन्न व औषध प्रशासनाची पथके तैनात करण्यात आली आहेत. खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडील परवान्याचीही तपासणी केली जात आहे. विक्रेत्यांकडील खाद्यपदार्थ मुदतबाह्य आहेत का, यावरही पथकांची बारकाईने नजर आहे. विक्रेत्यांनी शिळे खाद्यपदार्थ विकू नयेत, अशी सक्त ताकीद प्रशासनाने केली आहे. त्याचबरोबर दुग्धजन्य पदार्थ योग्य तपमानात साठवून ठेवावेत. यासह चांगल्या प्रतीच्या खाद्यतेलाचा वापर करावा, अशीही सूचना करण्यात आली आहे.
 
पालखी मार्गावर पुण्यापासून पंढरपूरपर्यंत अन्न व औषध प्रशासनाची पथके रस्त्यांवरील उघड्या खाद्यपदार्थांची तपासणी करणार आहेत. वारकर्‍यांना अन्नातून विषबाधा होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. आषाढी यात्रेवेळी पंढरपूरमध्ये २० ते २५ अधिकारी तैनात असतील. यात्रेच्या काळात खाद्यपदार्थांची तपासणी करतील.
- सुरेश अन्नापुरे, सहआयुक्त,  अन्न व औषध प्रशासन, पुणे विभाग. 

Related Articles