व्यापारी रमले वारकरी सेवेत   

गुळ-भुसार, फळ, भाजीपाला, फुल विभागात टाळ, मृदंगाचा गजर 

पुणे : संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या मुक्कामी पुण्यात आहेत. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही वारकरी मार्केटयार्डात मोठ्या प्रमाणात मुक्कामाला आहेत. शनिवारी दिवसभर व्यापारी कुंटुब आणि मित्र परिवारासह वारकर्‍यांच्या सेवेत रमले होते. टाळ, मृदंग आणि अभंगांनी संपूर्ण परिसर काल भक्तिरसात न्हावून निघाला. 
 
संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचेे शुक्रवारी शहरात उत्साहात आगमन झाले. शनिवारी दुपारपासूनच दिंड्या मार्केटयार्डातील विविध विभागासह भुसार विभागात दाखल झाल्या. यंदा गुळ-भूसार विभागातील सुमारे ४४ सभासदांच्या दुकानात वारकर्‍यांच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली होती. सभासदांच्या दुकानात सुमारे २० ते २५ हजार वारकरी, भक्त तसेच भाविकांची भोजन, चहापाणी, अल्पोपहार, स्वच्छतागृहे व राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या विभागातील व्यापारी, दिवाणजी व कर्मचार्‍यांनी वारकर्‍यांची भक्तीभावाने सेवा केली. 
 
भुसार विभागातील व्यापारी राजेंद्र गुगळे, राजेंद्र बाठिया, विजय मुथ्था या व्यापार्‍यांच्या गाळ्यासह अन्य व्यापार्‍यांच्या गाळ्यावर हजारो वारकरी मुक्कामाला असल्याने दरवर्षीप्रमाणे यंदाही गूळ व भुसार विभागातील संपूर्ण स्वच्छता, औषध फवारणी, पावडर फवारणी, पुरेसा पाणी पुरवठा, वीज, तसेच स्वच्छतागृहे व सुरक्षा व्यवस्था कृषी उत्पन्न बाजार समिती, तसेच येथील सर्व घटकांतर्फे करण्यात आली होती. 
 
वारकर्‍यांसाठी लागणार्‍या आवश्यक वस्तू रेनकोट, खाद्यान्न पाकीटे, पाण्याच्या बाटल्या, कपडे अशा स्वरुपाची मदत करण्यात आली. बाहेरून येणार्‍या ग्राहकांनीही या सेवेचा लाभ घेतला. मार्केटयार्डातील गूळ-भुसार विभागात दोन दिवस आनंदी व भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. या सेवेमुळे व्यापारी व वारकर्‍यांचे ऋणानुबंध तयार झाले आहेत. यंदाही  दि पूना मर्चंटस् चेंबरतर्फे मार्केटयार्डमधील जे व्यापारी अनेक वर्षांपासून वारकर्‍यांची सेवा करत आहेत अशा व्यापार्‍यांचा कार्यकारिणी सदस्य व पदाधिकार्‍यांनी समक्ष जाऊन उपरणे, टोपी, तुळशीवृंदावन देऊन सन्मानित केले, अशी माहिती चेंबरचे अध्यक्ष रायकुमार नहार व माजी अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी दिली. 
 
सभापती, सचिवांनी घेतले दर्शन
 
मार्केटयार्डातील विविध विभागात वारकरी मोठ्या प्रमाणात मुक्कामी असतात. त्यामुळष कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, सचिव डॉ. राजाराम धोंडकर, संचालक संतोष नांगरे यांनी गुळ-भुसार विभाग, फुलबाजार, फळे व भाजीपाला विभागातील दिंड्यांना भेटी दिल्या तसेच ज्या ज्या व्यापार्‍यांनी वारकर्‍यांच्या भोजनाची व्यवस्था केली आहे. तेथेही बाजार समितीच्या पदाधिकार्‍यांनी भेट देवून प्रसाद घेतला. त्या त्या विभागातील विभाग प्रमुखांनीही वारकर्‍यांच्या भेटी घेतल्या. 
 
फळे, भाजीपाला विभागातही वारकरी सेवा 
 
फळ विभागातील व्यापारी व बाजार समितीचे संचालक गणेश घुले, अनिरूद्ध भोसले, व्यापारी रोहन जाधव, मिलिंद जाधव, पांडुरंग सुपेकर, युवराज काची, महेश शिर्के यांच्या गाळ्यांवर वारकरी मुक्कामी आहेत. गणेश घुले, पाडुरंग सुपेकर व रोहन जाधव यांच्या गाळ्यावर काल दिवसभर वारकर्‍यांसाठी मालीश सुविधा उपलब्ध होती. संतोष ओसवाल यांच्या स्मरनार्थ युवराज काची यांच्याकडून पाच हजार वारकर्‍यांना फ्रुट डिशचे वाटप करण्यात आले.

Related Articles