वाचक लिहितात   

मातृभाषा ज्ञानभाषा होण्यासाठी इच्छाशक्ती हवी

केसरी दि.२८ जूनमधील मातृभाषा हा ज्ञानमार्गाचा पाया हा डॉ. दीपक बोरगावे यांचा ’परामर्श’ वाचला. न्गुगी वा थियांगो यांच्याप्रमाणेच तुरुंगात असताना लेखन तेही मातृभाषेत केलेली भारतीय स्वातंत्र्यसेनानींची उदाहरणे लेखात दिलेली आहेतच. सावरकरांनीही कागद नाही तर, तुरुंगाच्या भिंती मातृभाषेतील हृदयस्पर्शी कवितांनी, वचनांनी रंगवल्या होत्या. मुळात आपण विचार करतो तो आधी मातृभाषेत आणि मग ते संवादासाठी आवश्यक त्या भाषेत संक्रमीत करतो. त्यामुळे खरेतर मातृभाषेवर दुसर्‍या भाषेचे वर्चस्व राहू शकत नाही. व्यावहारिक जगात आपण मागे राहून आपले सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून केवळ आपण जागतिक स्तरावरील इंग्रजी आणि राष्ट्रीय स्तरावरील बहुभाषिकांची किंवा अन्य भाषक सर्वसामान्यपणे आकलन करून आपल्याशी संवाद साधू शकतील, अशी सर्वसामान्य भाषा वापरतो. सद्य:स्थितीत भारतात अशी भाषा हिंदी ही समजली जाते; पण जपानी, चिनी, जर्मन, कोरियन नागरिकांसारखे आयात तंत्रज्ञानही आपल्या मातृभाषेत विकसित करण्यासाठी, म्हणजेच आपली मातृभाषा मराठी ही ज्ञानभाषा करण्यासाठी जबरदस्त इच्छाशक्तीची अन् अथक प्रयत्नांची आवश्यकता आहे हे निश्चित.

श्रीपाद पु. कुलकर्णी, पुणे

व्यायामाचा अभाव घातक

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार जगभरातील १.८ अब्ज प्रौढांमध्ये शारीरिक हालचालींच्या अभावामुळे त्यांना स्ट्रोक, हृदयविकार, टाईप २ चा मधुमेह आणि काही प्रकारच्या कर्करोगाचा धोका अधिक प्रमाणात असू शकतो. कार्यालयात सलग आठ तासांहून अधिक वेळ बसून केली जाणारी नोकरीची कामे, एकाच ठिकाणी बसून केली जाणारी डिजिटल करमणूक हे प्रमाण सामान्य जीवनशैलीपेक्षा जास्त धोकादायक ठरू शकते. दीर्घकाळ शरीराची हालचाल न झाल्याने रक्ताभिसरण मंदावते. फॅटी अ‍ॅसिड्स आणि लिपिड्स रक्तवाहिन्यांच्या आंतरपटलांवर साचतात आणि धमन्यांमध्ये चरबीचे थर साचू लागतात. त्याच्या परिणामांनी कोरोनरी आर्टिलरीज अरुंद होऊन हृदयविकाराचा धोका वाढतो. कोणतीही शारीरिक हालचाल न करण्यामुळे लठ्ठपणा वाढतो. वाढलेला लठ्ठपणा हा धूम्रपानाइतकाच धोकादायक असतो. सतत बसून राहिल्याने शरीरातील मोठे स्नायू काम करणे थांबवितात. परिणामी शारीरिक चयापचय क्रिया मंदावते. शरीरातील साखर, कोलॅस्ट्रॉरल चरबी घटकांचा समतोल बिघडतो. यासाठी सतत बसून राहणे थांबविले पाहिजे किंवा मधूनमधून फिरत राहाणे गरजेचे असते. अल्पकाळ चालण्याने, स्ट्रेचिंग करण्याने रक्ताभिसरण सुधारते. कार्यालयीन कामकाजाकडे लक्ष देण्यासाठी वेळेला महत्त्व देणारी माणसे शारीरिक हालचाल न करता आपले आरोग्य तंदुरुस्त ठेवू शकत नाहीत, याला उपाय काय?

स्नेहा राज, गोरेगांव.

वृक्षारोपणात जनतेचा सहभाग

राज्यात यंदा दहा कोटी वृक्ष लागवड करणार ! मुख्यमंत्री आणि वृक्षारोपणाचे उद्दिष्ट मोठे पण प्रत्यक्षात लागवड कमीच या वार्ता वाचनात आल्या. गेली अनेक वर्षे कोटीमध्ये वृक्षारोपण होते. या गतीने सारा महाराष्ट्र हिरवागार व्हायला हवा; पण वास्तव काय आहे हे जनता ओळखून आहे. मुळात शासनाकडे १० कोटी रोप आहेत का? आणि ती लावण्यासाठी जितकी जागा हवी त्याचा काय हिशोब? यासाठी जनसहभाग आवश्यक आहे. पूर्वी वनखात्याकडे पडीक जमीन वृक्ष लागवडीसाठी नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थांना  कराराने देण्याची योजना होती, त्याचा फेरविचार करावा. अनेक सामाजिक संस्था हे कार्य करीत आहेत. जागा मिळाल्यास ते आणखी जोमाने वृक्ष लागवड करतील. जनतेने पण घरी आणलेल्या फळांच्या बिया कचर्‍यात न टाकता त्या वाळवून ठेवाव्यात. प्रवासाला जाताना त्याची उधळण करावी.

विजय देवधर, पुणे

शाळेत वर्तमानपत्र वाचणे अनिवार्य करा

हिमाचल प्रदेश सरकारने राज्याच्या शिक्षण विभागाला सर्व सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी सकाळच्या प्रार्थनासभेत वर्तमानपत्रातील बातम्या वाचणे अनिवार्य केले आहे. हिमाचल प्रदेश सरकारचा हा निर्णय स्वागतार्ह आहे. हिमाचल प्रदेश सरकारप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही महाराष्ट्रातील सर्व सरकारी शाळेत हा निर्णय लागू करावा. पूर्वी महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये वर्तमानपत्र येत असत. परिपाठात विद्यार्थी वर्तमानपत्रातील बातम्या वाचून दाखवत असत; मात्र गेल्या काही वर्षांपासून सरकारी शाळेत वर्तमानपत्र येत नाहीत. त्यामुळे परिपाठात बातम्या वाचून दाखवल्या जात नाहीत. आता ती पुन्हा सुरू करण्याची वेळ आली आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होऊन वाचन संस्कृती रुजण्यास मदत होईल.

श्याम ठाणेदार, दौंड जिल्हा पुणे

 

Related Articles