इरफान शेखला अखेरचा निरोप   

अहमदाबाद विमान अपघात
 
पिंपरी : अहमदाबाद दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेला विमान कर्मचारी इरफान शेख याच्या पार्थिवावर शनिवारी अंत्यसंस्कार पार पडले.  तो दोन वर्षांपासून एअर इंडियात कामास होता. १२ जून रोजी विमान दुर्घटनेत त्याचा मृत्यू झाला. 
 
इरफानच्या वडिलांचे रक्ताचे नमुने डीएनए तपासणीसाठी घेण्यात आले होते. नवव्या दिवशी अर्थात शुक्रवारी त्याचा अहवाल आला. काल सकाळी साडेसात वाजता पुणे विमानतळावर इरफानचे पार्थिव पोहचले. तिथून पिंपरी-चिंचवडच्या राहत्या घरी आणण्यात आले. त्यानंतर, सकाळी साडेनऊ वाजता अंत्यसंस्कार पार पडले.इरफान हा पिंपरीतील संत तुकारामनगरमध्ये राहायला होता.  मात्र, काही दिवसांपासून मुंबईत राहात होता.  आजी, आजोबा, आई, वडील आणि भाऊ असे त्याचे कुटुंब.   
 
इरफान दोन वर्षांपूर्वी एअर इंडियामध्ये कामाला लागला होता. अत्यंत मनमिळावू असलेला इरफान नुकताच ईदसाठी संत तुकारामनगरमधील घरीही येऊन गेला होता. त्याच्या जाण्याने त्यांच्या नातेवाईकांना धक्का बसला. तो आधी डोमेस्टिक क्रू आणि नंतर इंटरनॅशनल क्रू मध्ये कार्यरत होता. शेख कुटुंबीय मूळचे सातार्‍यातील मेढा येथील आहेत. मात्र, पन्नास वर्षांपासून पिंपरीत स्थायिक झाले आहेत. इरफानचे लंडनच्या दिशेने विमान झेपावण्याआधी आईशी बोलणे झाले होते. इरफानला नेहमी निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जायला आवडायचे. तो नेहमी आई-वडिलांना मी फिरायला घेऊन जाणार, असे म्हणत असे. पण, त्याची ही इच्छा अपूर्णच राहिली. इरफानने पिंपरी-चिंचवडमध्ये कुटुंबासोबत ईद साजरी केली होती. परंतु, तो पुन्हा कधीच परत येणार नाही, असे कुणालाही वाटले नव्हते, असे त्याच्या काकांनी सांगितले.

Related Articles