शुबमन-रिषभ यांची शतके   

लीड्स : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील दुसर्‍या दिवशी भारतीय संघाचा पहिला डाव ४७१ धावांत आटोपला. शुबमन गिल (१४७) आणि रिषभ पंत (१३४) या जोडीने शतकी खेळी केली. काल ३ बाद ३५९ धावांवरून दुसर्‍या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली. रिषभ पंतने भारतीय संघासाठी तिसरे शतक साकारले. कर्णधार शुबमन गिल बाद झाल्यावर भारताचे बाकी फलंदाज झटपट बाद झाले. 
 
कर्णधार शुबमन गिल आणि उप कर्णधार रिषभ पंत जोडीने ७१ धावांची भागीदारी साकारत नव्या दिवसाची जबरदस्त सुरुवात केली. रिषभने आपल्या कसोटी कारकीर्दीतील ७ वे शतक झळकावले. शुबमन हा शोएब बशीरच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात झेलबाद झाला. त्याने २२७ चेंडूत १९ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १४७ धावांची खेळी केली. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या करुण नायरला स्टोक्सने शून्यावर बाद केले. टंग याने रिषभला पायचित केले. तो १७८ चेंडूत १२ चौकार आणि ६ षटकाराच्या मदतीने १३४ धावा करून माघारी फिरला. गिल आणि रिषभनंतर एकाही भारतीय फलंदाजाला मैदानात तग धरता आली नाही.  

Related Articles