गुकेशकडून कार्लसनचा पराभव   

जगरेब  : भारताचा युवा बुद्धीबळपटू डी. गुकेश याने ग्रँड चेस टूर स्पर्धेत नॉर्वेचा वर्ल्ड नंबर वन मॅग्नस कार्लसन याला पराभवाचा धक्का दिला आहे. क्रोएशियातील जगरेब येथे रंगलेल्या बुद्धीबळ स्पर्धेतील सहाव्या फेरीत डी. गुकेशनं याने बुद्धीबळ जगात भारी असलेल्या कार्सनला जागा दाखवलीये. या लढतीआधी नॉर्वेच्या खेळाडूनं भारतीय युवा स्टार माझ्यासमोर अगदी किरकोळ असल्याचे म्हटले होते.  
 
या स्पर्धेतील पहिल्या दिवशी सुपर यूनायटेड रॅपिड अन् ब्लिट्ज चेस टूर्नामेंटच्या पहिल्या तीन फेरीनंतर भारताचा डी. गुकेश संयुक्तरित्या अव्वलस्थानी होता. चौथ्या फेरीत उझबेकिस्तानच्या नोदिरबेक अब्दुसत्तोरोव आणि पाचव्या फेरीत अमेरिकन ग्रँडमास्टर फॅबियानो कारूआना याला पराभूत केल्यावर सहाव्या फेरीत डी. गुकेश याच्यासमोर कार्लसन याचे मोठे आव्हान होते. सध्याच्या घडीला बुद्धीबळ जगतात दबदबा असणार्‍या खेळाडूला शह देत डी. गुकेशनं स्पर्धेत लक्षवेधी कामगिरी करून दाखवली. बुद्धीबळाच्या पटलावर सर्वोत्तम खेळ दाखवत भारताच्या  बुद्धीबळपटूनं त्याची चांगलीच जिरवली आहे. या पराभवामुळे वर्ल्ड नंबर वन कार्लसनवर अति शहाणा त्याचा बैल रिकामा अशीच काहीशी वेळ आलीे.    
 
भारतीय डी. गुकेश हा कमकुवत खेळाडूंपैकी एक आहे, अशा आशयाच्या शब्दांत कार्लसन याने भारतीयासोबतची लढत माझ्यासाठी एकदम सोपी आहे, असे म्हटले होते. पण रॅपिड गटातील लढतीत डी. गुकेशनं सर्वोत्तम खेळ करत पहिली बाजी जिंकून २ गुण आपल्या खात्यात जमा केले आहेत.आता या स्पर्धेत दोन्ही खेळाडूंमध्ये ब्लिट्झ प्रकारात दोन लढती होणार आहे. भारतीय ग्रँडमास्टर आणि विद्यमान वर्ल्ड चॅम्पियन डी. गुकेश याने याआधी नॉर्वेतील बुद्धीबळ स्पर्धेतही  कार्लसनला पराभूत केले होते. आता दुसर्‍यांदा डी. गुकेशनं स्टार बुद्धीबळपटूसमोर छाप सोडली आहे. डी गुकेश शिवाय आर प्रज्ञाननंदा यानेही या खेळाडूला पराभूत करुन दाखवले आहे.

 

Related Articles