गरीब रुग्णांना उपचार नाकारणार्‍या धर्मदाय रुग्णालयांवर कठोर कारवाई   

जैस्वाल यांची माहिती

मुंबई, (प्रतिनिधी) : सरकारकडून विविध सवलती घेणार्‍या धर्मदाय रुग्णालयांनी गरीब, निर्धन रुग्णांवर मोफत उपचार केले पाहिजे, असे बंधनकारक असतानाही उपचार नाकारणार्‍या रुग्णालयांबाबत सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात झालेली घटना वेदनादायक होती. या प्रकरणाची चौकशी करून रुग्णालय व डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर कारवाई करण्यात आली. घैसास यांचे रजिस्ट्रेशन रद्द करण्याचीही शिफारस करण्यात आली आहे. धर्मदाय रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजनेसह सर्व योजनांअंतर्गत उपचार करावे लागतील. रुग्णांना मदत करण्यासाठी आरोग्य दूत नेमण्यात येत असल्याची माहिती राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांनी गुरुवारी विधानसभेत दिली.
 
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सना मलिक यांसह अनेक सदस्यांनी धर्मदाय रुग्णालये व मंगेशकर रुग्णालयातील घटनेबाबत लक्षवेधी सूचनेद्वारे विधानसभेत चर्चा उपस्थित केली होती. यावेळी विरोधी पक्षांबरोबरच सत्ताधारी बाजूच्या सदस्यांनीही तीव्र भावना व्यक्त केल्या. 
 
चर्चेदरम्यान उपस्थित प्रश्नांना उत्तर देताना जैस्वाल यांनी धर्मदाय रुग्णालयात निर्धन व गरीब रुग्णांसाठी प्रत्येकी १० टक्के खाटा आरक्षित ठेवून मोफत उपचार करण्याबाबत न्यायालयाचे निर्देश आहेत. परंतु, अनेक रुग्णालये याचे पालन करत नव्हते. त्यामुळे त्यावर देखरेख ठेवण्यासाठी १८६ आरोग्यदूत नेमण्यात येत आहेत. तसेच, कोणत्या रुग्णालयात किती खाटा आरक्षित आहेत, या क्षणाला कुठे किती बेड उपलब्ध आहेत याची माहिती उपलब्ध करून देणारी व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. 
 
जे रुग्णालये ही माहिती देत नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. ज्यांनी सरकारकडून कोणता ना कोणता लाभ घेतला आहे व गरीब रुग्णांना सेवा देत नव्हते, अशा ३०० रुग्णालयांना  कायद्यात दुरुस्ती करून या कक्षेत आणण्यात आले आहे. सरकार या विषयावर अत्यंत गंभीर असून नियमाचे पालन न करणार्‍या रुग्णालयावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा जैस्वाल यांनी दिला.
 
पुण्याच्या मंगेशकर रुग्णालयात जी घटना घडली ती मनाला वेदना देणारा विषय आहे. संपूर्ण महाराष्ट्रात याची चर्चा झाली. आरोग्य विभागाने याची चौकशी केली, त्याचा अहवाल आल्यानंतर सरकारने कारवाई केली. नर्सिंग कायद्यानुसार कारवाई केली. पण, या कायद्यात जास्तीत जास्त दंडाची तरतूद पाच हजार होती. दंडाची रक्कम वाढवण्यात येत आहे. डॉ. घैसास यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल कायद्यानुसार त्यांच्यावरही कारवाई सुरू आहे.  त्यांचे रजिस्ट्रेशन रद्द करण्याची विनंती करण्यात आली असल्याचे जैस्वाल यांनी सांगितले.
 

Related Articles