नव्या युद्धाचे संकट   

शंतनू चिंचाळकर 

इराणने अणुबॉम्ब बनवला तर त्याचा पहिला प्रयोग आपल्यावर होईल अशी जवळपास खात्री इस्रायलला वाटते. त्यामुळे त्यांनी इराणची अणुसंशोधन केंद्रे,अणुभट्ट्या,हवाई दलांचे तळ यांवर हल्ले केले. त्याला इराणने प्रत्युत्तर दिले. त्यातून पश्चिम आशियात नवे युद्ध सुरु झाले.त्याचा फटका जगाला बसणार आहे.
 
सीबीएस न्यूज या वृत्त संस्थेने  १० जून रोजी सूत्रांच्या हवाल्याने सांगितले  की, इस्रायल इराणमध्ये लष्करी कारवाई करण्याची पूर्वतयारी करत आहे. अमेरिकेला भीती होती की इस्रायलने इराणवर हल्ला केल्यास इराण शेजारी इराकमधील काही अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले करून प्रत्युत्तर देऊ शकतो. १२ जूनच्या रात्रीपासून इस्रायलने इराणवर प्रथम क्षेपणास्त्रांचा वर्षाव, त्यापाठोपाठ विमाने आणि ड्रोनद्वारे हल्ले सुरू केले.  या  हल्ल्यात इराणचे सैन्य, हवाई संरक्षण प्रणाली आणि आण्विक केंद्रांचे  नुकसान झाले. इराणचे लष्कर प्रमुख   हुसेन सलामी ई यांच्याबरोबर कैक कमांडर तसेच सहा शास्त्रज्ञदेखील मरण पावले. 
 
प्रत्युत्तरादाखल इराणनेदेखील इस्रायलवर क्षेपणास्त्रांद्वारे हल्ले केले. त्यात इस्रायलच्या तेल अविवसह इतर प्रमुख शहरांचे नुकसान झाले. पाश्चात्य गुप्तहेर संस्थांनी २००२ मध्ये इराणचा गुप्त आण्विक कार्यक्रम उघड केला होता. त्यानंतर बरीच वर्षे इराणी अधिकारी उघडपणे अण्वस्त्रे तयार करण्याची धमकी देत होते. मध्यंतरी एका हेलिकॉप्टर अपघातात इराणचे तत्कालीन अध्यक्ष आणि परराष्ट्र मंत्री ठार झाले तेव्हाही त्या घटनेत इस्रायलचा हात असल्याचे आढळल्यास गंभीर परिणामाला सामोरे जावे लागेल, अशी धमकी इराणने दिली होती. त्यावेळीदेखील इराण अण्वस्त्रसज्ज असल्याची शंका जगाला आली होती. डिसेंबर २०२४ मध्ये इराणचे माजी परराष्ट्रमंत्री कमल खराझी यांनी इस्रायलला सरळ सरळ आण्विक हल्ल्याची धमकी दिली. तेव्हापासूनच अस्वस्थ असणार्‍या इस्रायलकडून इराणवर मोठा हल्ला होणार हे निश्चित होते. तसा तो झाला आणि जगभरात गदारोळ माजला.
 
इराणकडे आधीच अण्वस्त्रे आहेत आणि त्यांनी अद्याप त्यांची चाचणी केलेली नाही, असा दावा इराणी संसदेच्या परराष्ट्र धोरण समितीच्या माजी सदस्याने १० मे रोजी केला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना इराण आण्विक हत्यार बनवण्याच्या अगदी जवळ पोहचला असल्याचे सांगितले. त्यामुळे या देशावर कठोर निर्बंध लादणे गरजेचे आहे, असे विधान करत त्यांनी इराणच्या तेल निर्यातीला लक्ष्य करण्याचा आदेश दिला. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायलची ढाल बनून उभ्या असलेल्या अमेरिकेलाही युद्धाच्या आगीत जाळण्याची धमकी दिली. या धमकीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने अरबी समुद्रात लष्करी ताकद  वाढवली. इस्राायलची सुरक्षितता हे अमेरिकेला चिंता वाटण्याचे कारण नव्हे, तर इराणच्या अण्वस्त्र सज्जतेबाबतही अमेरिका साशंक आहे. म्हणून अमेरिकेने इस्रायलच्या आडून इराणवर हल्ले केले, असे म्हणायला जागा आहे.  
 
अण्वस्त्रे बनवण्याचे तंत्रज्ञान इराणने पाकिस्तानकडून मिळवले असण्याची शंका आहे. आपल्या देशात अतिरेकी संघटनांना थारा देणार्‍या पाकिस्तानकडे असलेली अण्वस्त्रे कितपत सुरक्षित आहेत, याबद्दलही शंका आहे. तीच परिस्थिती इराणच्या बाबतीतही आहे. सीरिया, येमेन, पॅलेस्टाईन आणि लेबाननमध्ये असलेल्या इस्रायलविरोधी हमास आणि हिज्बुल्ला यांच्या हाती ही अण्वस्त्रे पडल्यास अवघ्या जगात हाहाकार उडेल, ही भीती व्यक्त करताना इस्रायलने इस्फहान अणु तंत्रज्ञान केंद्राजवळ हल्ला केला होता. यामध्ये अणु संशोधन अणुभट्टी, युरेनियम समृद्धीकरण प्रकल्प आणि इंधन उत्पादन प्रकल्प आहे. पण त्यावेळी या हल्ल्यात इराणच्या अण्वस्त्र केंद्रांना इस्रायलने थेट लक्ष्य केले नसले तरी, इराणच्या नेतृत्वाने आपल्या आण्विक धोरणावर पुनर्विचार करण्यासाठी धमकी म्हणून हे हल्ले केल्याचे इस्रायलने स्पष्ट केले. मात्र तरीही इराणने आपला आण्विक कार्यक्रम पुढे चालू ठेवल्याने १२ जून रोजी इस्रायलने इराणच्या आण्विक ऊर्जा प्रकल्पावर हल्ले केले. 
 
इराणच्या आण्विक समस्येवर वेळेवर आणि गैरलष्करी तोडगा काढण्यासाठी ट्रम्प यांनी दुसर्‍यांदा अमेरिकेच्या अध्यक्षपदी आल्यावर इराणवर व्यावसायिक निर्बंध लादायला सुरुवात केली. पण आजवरचा इतिहास पाहता इराण त्याकडे कितपत गांभिर्याने पाहील याबाबत इस्रायल साशंक होता. त्यातूनच या देशाने मोसाद या आपल्या गुप्तहेर यंत्रणेद्वारे इराणच्या आण्विक कार्यक्रमाची गुप्त माहिती काढली आणि कथित धोका लक्षात येताच हे हल्ल्याचे पाऊल उचलले, असे म्हणायला जागा आहे. इस्रायलच्या मते इराण गुप्तपणे अण्वस्त्रनिर्मिती करण्याच्या मार्गावर असून त्याची युरेनियम समृद्धीकरणाच्या क्रियाकलापांची व्याप्ती अज्ञात आहे. अशा परिस्थितीत इराणने अण्वस्त्रनिर्मिती केल्यास ती दहशतवादी संघटनांच्या हाती लागण्याची शक्यता आहे. अशी अण्वस्त्रे दहशतवाद्यांकडून कोणाही देशाविरुद्ध वापरली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच इस्रायल इराणविरुद्ध करत असलेल्या कारवाईला अमेरिकेसाठी पाश्चात्य देशांचा ठाम पाठिंबा असेल. 
 
यातून अगदी जागतिक युद्धाला सुरुवात होण्याची शक्यता नसली तरी  दहशतवादी संघटनेमुळे लेबाननसारखा एखाद दुसरा देश यात ओढला जाण्याची शक्यता आहे. यावेळी इस्रायलने इराणवर केलेले हल्ले पाहता कोणाचाही विरोध न जुमानता आरपारची लढाई करण्याचा इरादा केल्याचे स्पष्ट जाणवत आहे. इस्रायलने इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाचे  नुकसान केल्यावर इराणचे संरक्षणमंत्री महमद बघेरी यांनी इस्रायलने इराणवरील हल्ले ताबडतोब न थांबवल्यास पाकिस्तान इस्रायलविरुद्ध अण्वस्त्रांचा वापर करेल, असे विधान करून खळबळ उडवून दिली तेव्हा इराणनंतर पाकिस्तानची अण्वस्त्रे इस्रायल आणि अमेरिकेकडून नष्ट केली जातील, अशी अटकळ बांधली जाऊ लागली. एकीकडे इराणचे अध्यक्ष आयतुल्ला खामेनी यांना मारल्याशिवाय हे युद्ध थांबणार नाही अशी घोषणा इस्रायलकडून केली जात होती, तर खामेनी कुठे आहेत याची माहिती आमच्याकडे असून आता त्यांना लक्ष्य  करायचा  इरादा नसल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले.
 
ताज्या  हल्ल्यात आपली कोणतीही भूमिका नव्हती हे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. ११ जून रोजी  ट्रम्प यांनी इराणला कोणत्याही परिस्थितीत अण्वस्त्रे बनवू देणार नाही असे वक्तव्य केले होते. १६ जून रोजी कॅनडातील अल्बर्टा येथील जी-७ शिखर परिषदेत  ट्रम्प यांनी भाग घेतला . त्या परिषदेत सर्व देशांनी एकमताने इस्रायलची कारवाई उचित असल्याचा ठराव मंजूर करत पूर्ण पाठिंबा दिला. त्याच दिवशी डोनाल्ड ट्रम्प संमेलन सोडून अमेरिकेला परतले. तेव्हाच ते काही तरी मोठी घोषणा करणार हे निश्चित झाले. 
 
इराणच्या हवाईक्षेत्रावर पूर्णपणे आमचे वर्चस्व प्रस्थापित झाले असून इराणने त्वरित युद्धातून बिनशर्त माघार घ्यावी अन्यथा परिणाम वाईट होतील, अशी धमकीही ट्रम्प यांनी दिली. या घोषणेद्वारे चालू युद्धात आपलाही सहभाग असल्याचे आणि इराणवर अमेरिकेकडूनही हल्ले होणार याचे सरळ संकेत मिळाले. हिंद सागरात अमेरिकेने आपल्या विमानवाहू नौका हलवल्यावर या संकेतांना दुजोरा मिळाला. अशा परिस्थितीत पाश्चिमात्य देश आणि काही मुस्लिम राष्ट्रे युद्धात उतरतील आणि तिसर्‍या जागतिक युद्धाला सुरुवात होईल असा अंदाज काही संरक्षणतज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. एक युद्ध एखाद्या  देशाला १५-२० वर्ष मागे घेऊन जाते आणि अशा युद्धात जाणारे निष्पाप जनतेचे बळी आणि होणारे हाल तर कैक वर्षांचा आघात करून जातात.त्यमुळेच या नव्या युद्धाने जगापुढे संकट उभे केले आहे.

Related Articles