ट्रम्प यांच्या प्रतिकाराचे प्रतीक!   

चर्चेतील चेहरे, राहुल गोखले 

जानेवारी मध्ये अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णयांचा धडाका लावला आहे. ते निर्णय अमेरिकेच्या हिताचे असल्याचा त्यांचा दावा असला तरी त्यांना अमेरिकेतच वाढता विरोध होत आहे. याचे कारण ट्रम्प यांचा हेकेखोरपणा. त्याचेच एक उदाहरण म्हणजे कॅलिफोर्निया प्रांतातील लॉस एंजेलिस येथे झालेला संघर्ष. 
 
ट्रम्प यांच्या स्थलांतरित-विरोधी धोरणाला विरोध करण्यासाठी तेथे निदर्शक रस्त्यावर उतरले आणि परिस्थिती तणावाची झाली. अर्थात पूर्ण लॉस एंजेलिस शहरात तशी परिस्थिती नव्हती. अगदी छोट्या भागात ती तशी असली तरी त्या घटनेची चर्चा जगभर झाली. कॅलिफोर्निया प्रांताच्या यंत्रणा परिस्थिती काबूत आणण्याचा प्रयत्न करीत होत्या. तथापि ट्रम्प यांनी मात्र हे निमित्त साधून केंद्रीय पोलीस दलाची तुकडी कॅलिफोर्नियात रवाना केली. त्यावरून कॅलिफोर्नियामधील डेमोक्रॅट पक्षाचे सरकार आणि   रिपब्लिकन पक्षाचे ट्रम्प प्रशासन  यांच्यात वादाची ठिणगी पडली.  कारण कॅलिफोर्निया प्रशासनाने केंद्रीय मदतीची मागणी केली नव्हती. पण ट्रम्प यांनी मनमानीपणा केला. त्याला कॅलिफोर्नियातील डेमोक्रॅट पक्षाच्या सरकारने तीव्र आक्षेप घेतला. ट्रम्प यांच्या निर्णयास न्यायालयात आव्हान देण्यापर्यंत मजल गेली. त्या प्रांताचे गव्हर्नर गॅविन न्यूसम यांनी ट्रम्पविरोधी आघाडीचे नेतृत्व स्वीकारले. ट्रम्प यांनी हार्वर्ड विद्यापीठासारख्या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेवर  नियंत्रण आणण्याचा चालवलेला प्रयत्न त्या विद्यापीठाचे अध्यक्ष अ‍ॅलन गार्बर यांनी निर्धाराने परतावून लावला होता आणि ते ट्रम्प यांच्या जुलूमशाहीच्या प्रतिकाराचे प्रतीक बनले होते. आता न्यूसम यांची तीच प्रतिमा झाली आहे. फरक इतकाच की न्यूसम यांच्या महत्त्वाकांक्षा निराळ्या आहेत.
 
न्यूसम हे डेमोक्रॅट पक्षाचे नेते असले तरी त्यांच्या भूमिकांमध्ये पक्षीय शिस्तीपेक्षा अनेकदा मनस्वीपणा डोकावतो. त्यास त्यांचे विरोधक संधिसाधूपणा म्हणतात. त्यामुळेच आता ट्रम्प यांना ते करीत असलेल्या विरोधामागे त्यांची राजकीय गणिते नसतीलच असे ठामपणे म्हणता येणार नाही. कोरोनाच्या साथीच्या काळात ट्रम्प हेच अमेरिकेचे अध्यक्ष होते. आणि त्यांनी ती परिस्थिती ज्या पद्धतीने हाताळली होती त्यावर डेमोक्रॅट पक्षाचे नेते तोंडसुख घेत असताना त्यावेळीही कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर असलेले न्यूसम मात्र ट्रम्प यांची प्रशंसा करण्यात गुंतले होते. तेंव्हा आपल्याच पक्षालाही त्यांनी काहीदा अडचणीत आणले आहे. त्यामुळेच आता त्यांच्या ट्रम्पविरोधामागे पुढची राजकीय समीकरणे नसतीलच असे नाही या संशयास वाव आहे.न्यूसम गेली किमान तीन दशके कॅलिफोर्नियाच्या राजकारणात सक्रिय आहेत. पण त्यांच्या कारकीर्दीची ती काही सुरुवात नाही. त्यापूर्वी ते उद्योजक होते. १० ऑक्टोबर १९६७ रोजी जन्मलेले न्यूसम यांचे वडील विलियम न्यूसम  न्यायाधीश होते. गॅविन यांना लहानपणीच डिस्लेक्शियाचे निदान झाले होते. या विकारात शिकण्यास, वाचण्यात अडचणी येतात. तरीही न्यूसम यांनी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. बेसबॉल खेळात न्यूसम प्रवीण होते आणि त्यासाठी त्यांना सांता क्लारा विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळाली होती. त्याच विद्यापीठातून न्यूसम राज्यशास्त्र विषयात पदवीधर झाले. त्यानंतर ते व्यावसायिक झाले. 
 
त्यांनी अनेक व्यवसाय उभारले. त्यांत रेस्टारंट, हॉटेल यांचा अंतर्भाव होता. त्यांची मालमत्ता ७० लाख डॉलरची असल्याचा मानले जाते. त्यानंतर ते राजकारणात आले. १९९३ मध्ये त्यांची नेमणूक सॅन फ्रॅन्सिस्कोच्या वाहतूक व पार्किंग विभागात करण्यात आली. त्यानंतर तीन वर्षांतच खर्‍या अर्थाने त्यांच्या  राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली. ते त्या शहराच्या परिषदेवर निवडून गेले.  पण त्यांच्या कारकीर्दीतील मैलाचा दगड ठरला तो ते २००३ मध्ये सॅन फ्रॅन्सिस्कोच्या महापौरप्दी निवडून आले तेंव्हा. त्या शहराचे सर्वात तरुण महापौर होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्या पदावर ते २०११ पर्यंत होते.आपल्या कार्यकाळात त्यांनी अनेक धडाकेबाज निर्णय घेतले असले तरी त्यांतील काही वादग्रस्त ठरले. महापौर झाल्यानंतर महिन्याभरातच त्यांनी समलैंगिक विवाह केलेल्या जोडप्यांना विवाह-प्रमाणपत्रे वितरित केली. वस्तुतः मध्यवर्ती सरकार आणि कॅलिफोर्निया सरकार या दोन्ही ठिकाणी केलेल्या कायद्यांचे उल्लंघन करणारा तो निर्णय होता. तेंव्हा त्याचे पडसाद उमटले. त्यांच्याच डेमोक्रॅट पक्षातून नाराजीचे सूर उमटले आणि न्यूसम यांच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यात आले. पक्षाच्या धोरणापेक्षा प्रसंगी वेगळी भूमिका घ्यायची हा न्यूसम यांचा खाक्या तेंव्हापासूनचा.
 
महापौरपदाचा दुसरा कार्यकाळ संपत आला तसे न्यूसम याना वेध लागले ते कॅलिफोर्निया प्रांताच्या गव्हर्नरपदाचे. पण डेमोक्रॅट पक्षाचे प्रबळ उमेदवार रिंगणात असल्याने न्यूसम यांनी त्या लढतीतून माघार घेणे पसंत केले;  मग त्यांनी नायब गव्हर्नरपदाच्या शर्यतीत उडी घेतली आणि ते निवडूनही आले. त्यावेळी त्यांना विशेष अधिकार नसले तरी प्रागतिक धोरणांना कायदेशीर आधार मिळावा म्हणून त्यांनी पाठपुरावा केला. फाशीच्या शिक्षेला बंदी घालणे, बंदूक परवाना पद्धतीवर निर्बंध आणणे इत्यादींचा त्यांत समावेश होता. अर्थात अधिकार नसल्याने न्यूसम यांना ते निर्णय पुढे रेटता आले नाहीत. नायब गव्हर्नरला मर्यादित अधिकार असतात याची खंत त्यांनी त्यावेळी व्यक्त केली होती. साहजिकच त्यांचे पुढचे लक्ष्य गव्हर्नरपदाचे होते हे उघड होते. 
 
२०१९ मध्ये ते कॅलिफोर्निया प्रांताचे गव्हर्नर म्हणून निवडून गेले. आपल्या पहिल्याच कार्यकाळात त्यांनी सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास निर्बंध घालण्यासारखे निर्णय अमलात आणले. ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाचा तो पहिला कार्यकाळ होता. तेंव्हा ट्रम्प आणि न्यूसम यांच्यातील खडाजंगी गाजू लागली. विशेषतः कॅलिफोर्नियामध्ये लागलेल्या वणव्यांच्या बाबतीत ट्रम्प प्रशासनाने मदत केली नाही असा न्यूसम यांचा आरोप होता. पण नंतर ट्रम्प व न्यूसम यांच्यात फोनवरून संभाषण झाल्यानंतर ट्रम्प प्रशासनाने मदतीला हिरवा कंदील दाखविला. तेंव्हा ट्रम्प यांची प्रशंसा न्यूसम यांनी केली होती.
 
अर्थात स्वतःच्या प्रांतात मात्र न्यूसम टीकेची धनी झाले होते. अकारण लॉकडाऊन, मास्क घालण्याची अतिरेकी सक्ती अशा निर्णयांमुळे कॅलिफोर्नियाची अर्थव्यवस्था डळमळीत झाली असे आरोप झाले. २०२२ मध्ये न्यूसम पुन्हा गव्हर्नरपदी निवडून गेले. पण याचा अर्थ त्यांच्याविषयी सार्वत्रिक समाधान होते असा नाही. कॅलिफोर्निया हा अमेरिकेतील मोठ्या प्रांतांपैकी एक. हॉलिवूड, सिलिकॉन व्हॅली अशांसाठी तो प्रसिद्ध. पण न्यूसम यांच्या गव्हर्नरपदाच्या कार्यकाळात त्या प्रांतात आर्थिक तूट वाढली. गुन्हेगारी वाढली. बेघरांच्या  संख्येत मोठी वाढ झाली. अमेरिकेतील एकूण बेघरांपैकी ३० टक्के कॅलिफोर्निया प्रांतात आहेत. महागाई गगनाला भिडली. आर्थिक गैरव्यवस्थापनाचा आरोप न्यूसम यांच्यावर झाला. त्याशिवाय त्यांनी अनेक वाद ओढवून घेतले. कोरोना काळात सार्वजनिक कार्यक्रम टाळावेत असा नियम न्यूसम यांनीच केलेला असताना ते मात्र फ्रेंच लाँड्री या रेस्टॉरंटच्या पन्नासाव्या वर्धापन दिना निमित्त आयोजित भोजन समारंभास हजर राहिले. तेंव्हा न्यूसम यांच्यावर टीकेची झोड उठली. एकीकडे हवामान बदलांसाठी उपाययोजना करण्याची वकिली करणारे न्यूसम यांनी कॅलिफोर्निया प्रांतातील वणव्यांवर आपत्ती व्यवस्थापन करण्यात ते कमी पडले अशी टीका झाली. 
 
गेल्या वर्षी झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उडी घेण्याची त्यांची इच्छा होती. तथापि पक्षाने कमला हॅरिस यांना उमेदवारी दिल्यानंतर न्यूसम यांनी माघार घेत हॅरिस यांना समर्थन जाहीर केले. पण आता त्यांना वेध लागले आहेत ते २०२८ च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे. कॅलिफोर्नियाचे गव्हर्नरपद दोनदाच भूषविता येते अशी कायद्यात तरतूद असल्याने न्यूसम यांचा कार्यकाळ २०२७ मध्ये  संपुष्टात येईल. तेंव्हा २०२८ साली थेट अध्यक्षपदाला गवसणी घालावी अशी त्यांची मनीषा आहे. त्यादृष्टीने त्यांनी तयारी सुरु केली आहे. त्यात एका बाजूला त्यांनी डेमोक्रॅट पक्षापेक्षा आपली वैयक्तिक प्रतिमा उजळ होईल यासाठी आटापिटा चालविला आहे. अलीकडेच त्यांनी ’धिस इज गॅविन न्यूसम ’हा पॉडकास्ट शो सुरु केला. विरोधाभास असा की त्यांनी त्यावर निमंत्रित केले ते स्टीव्ह बॅनन आणि चार्ली कर्क यांसारख्या कट्टर ट्रम्प समर्थकांना. एवढेच नव्हे तर महिलांच्या क्रीडा संघात खेळण्याची परवानगी ट्रान्सजेंडर महिलांना अजिबात देण्यात येऊ नये अशी भूमिका मांडून त्यांनी डेमोक्रॅट पक्षाच्या पारंपरिक भूमिकेला छेद दिला. डेमोक्रॅट पक्षातील उजवे अशी आपली प्रतिमा तयार करण्याचा न्यूसम यांचा हा प्रयत्न असावा.
 
एकीकडे लॉस एंजेलिस ते सॅन फ्रॅन्सिस्को आणि नंतर सॅक्रामेंटो पर्यंतच्या प्रस्तावित बुलेट ट्रेन प्रकल्पाला ट्रम्प यांनी आपल्या पहिल्या आणि आताच्या कार्यकाळात मदत रोखली म्हणून त्याच्यावर शरसंधान करायचे; ट्रम्प यांच्या एकाधिकारशाहीला न्ययालयात आव्हान द्यायचे, ट्रम्प यांनी आपल्याला अटक करून दाखवावी म्हणून अस्तन्या सावरायच्या आणि दुसरीकडे काही मुद्यांवर रिपब्लिकन पक्षाच्या धोरणांची री ओढून आपल्याच डेमोक्रॅट पक्षाच्या धोरणांशी विसंगत भूमिका घ्यायची हा न्यूसम यांचा जुना खेळ आहे. याला राजकीय लवचिकता म्हणायचे; वस्तुनिष्ठ भूमिका म्हणायचे की संधिसाधूपणा म्हणायचे हे अंतिमतः मतदार ठरवतील. तूर्तास ट्रम्प यांच्या प्रतिकाराचे प्रतीक बनणे फायद्याचे असल्याने गॅविन न्यूसम तेच करीत आहेत.

Related Articles