मिळकत कर ७ जुलैपर्यंत भरता येणार   

पुणे : मिळकत कराची सवलत मिळविण्यासाठी सोमवार हा शेवटचा दिवस होता. त्यामुळे कर भरण्यासाठी नागरी सुविधा केंद्रात पुणेकरांची मोठी गर्दी झाली होती. गर्दी वाढल्याने परिणामी यंत्रणेवर ताण आला. त्यामुळे अनेकांना कर भरता आला नाही, ही गैरसोय लक्षात घेत महापालिका प्रशासनाने ही मुदत ७ जुलैपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
 
आर्थिक वर्षाच्या संपुर्ण कर भरणार्‍यांना महापालिकेकडून मिळकतदारांना दहा किंवा पाच टक्के सवलत दिली जाते. ही सवलत ३१ मे पर्यंत पुर्ण वर्षभराचा मिळकत कर भरणार्‍यांना दिली जात असते. गेल्या तीन चार वर्षापासून मिळकत कर विभागातील विविध अडचणींमुळे ही या सवलतीसाठी मुदतवाढ दिली जात आहे. चाळीस टक्के सवलतीच्या विषयामुळे अनेक अडचणी या कालावधीत निर्माण झाल्या आहेत. या चाळीस टक्के सवलत मिळविण्यासाठी मिळकतदाराला पीटी थ्री फॉर्म भरून देणे बंधनकारक आहे. पीटी थ्री फॉर्म संदर्भातही अनेक आक्षेप, तक्रारी मिळकतदारांकडून येत आहे. महापालिकेच्या सर्व्हर डाऊन असणे अशा विविध कारणांमुळे ही सवलत पंधरा दिवस वाढवून द्यावी, अशी मागणी आपले पुणे या संस्थेने केली होती.
 
महापालिकेने संपुर्ण मिळकत कर मुदतीत भरणार्‍यांना दिली जाणार्‍या सवलतीची मुदत काल संपणार होती. मुदतीत वर्षभराचा मिळकत कर भरणार्‍यांना पाच आणि दहा टक्के इतकी सवलत दिली जाते. ही सवलत मिळण्याची शेवटची संधी असल्याने मिळकतदारांनी कर भरणा केंद्रावर गर्दी केली होती. तसेच ऑनलाइन कर भरणार्‍यांचा प्रतिसाद मुदतीच्या शेवटच्या दिवशी वाढला. यामुळे यंत्रणेवर ताण आल्याने ती बंद पडली, काही वेळ ती संथगतीने चालत होती. याकारणांमुळे अनेकांना मिळकत भरता आली नाही, अशा तक्रारी महापालिका प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत महापालिकेने कर सवलत मिळविण्यासाठीची मुदत सात दिवसांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
 
सात लाखांहून अधिकांनी घेतली सवलत
 
महापालिकेने जाहीर केलेल्या सवलतीचा फायदा घेत तब्बल १२४४ कोटी ५० लाख रुपये इतका मिळकतकर महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. यंदा चालू आर्थिक वर्षामध्ये मिळकत कर विभागाला ३२५० कोटी रुपयांचा महसूल गोळा करण्याचे उदिष्ट देण्यात आले आहे. आर्थिक वर्षाच्या पहील्या तिमाहीत सुमारे ७ लाख १० हजार ५५३ मिळकतदारांनी मुदतीत कर भरून सवलत मिळविली आहे. एकुण उद्दीष्टाच्या जवळ जवळ पन्नास टक्के उत्पन्न या तीन महीन्यात जमा झाले आहे.
 
मुदतीत कर भरावा 
 
मिळकत कर विभागाने ३० जुनपर्यंत संपुर्ण वर्षभराचा मिळकत कर भरणार्‍यांना सवलत जाहीर केली होती. ही मुदत ७ जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे. ७ जुलैपर्यंत नागरी सुविधा केंद्र सकाळी १० ते दुपारी ४ यावेळेत सुरु राहतील. तरी मिळकतदारांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता मिळकत कर ऑनलाइन किंवा नागरी सुविधा केंद्रात भरावा.
 
- अविनाश सकपाळ, उपायुक्त, कर आकारणी व कर संकलन विभाग

Related Articles