राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या विस्ताराला गती   

बावधनमध्ये उभारणार ‘म्युझियम सिटी‘

पुणे : राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या विस्तारित कामाला गती देण्यासाठी मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली. बावधन बुद्रुक येथील ६ एकर जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे संग्रहालय उभारण्यासाठी नामांकित आर्किटेक्चर नेमणुकीसाठी प्रशासकीय समितीची स्थापना, सविस्तर आराखड्यानंतर निधीची तरतूद करणे, तसेच नव्याने उभारल्या जाणार्‍या ‘म्युझियम सिटी’ला राजा दिनकर केळकर यांचेच नाव कायम ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याची माहिती कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी दिली.
 
वैभवशाली इतिहासाचे जतन आणि संवर्धन करणार्‍या केळकर संग्रहालयात ९ व्या शतकापासूनच्या २५ हजाराहून अधिक वस्तूंचा संग्रहीत ठेवा आहे. सध्या जागेअभावी केवळ १० टक्के वस्तू जनतेसाठी खुल्या आहेत. या पाश्वर्र्भूमीवर संग्रहालयाच्या विस्तारासाठी राज्य सरकारकडून यापूर्वीच बावधन बुद्रूक येथे ६ एकर जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यावेळी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक कार्य अपर मुख्य सचिव विकास खरगे, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, वित्तीय सुधारणा सचिव शैला ए, वित्त व नियोजन सचिव राजेश देशमुख, संग्रहालयाचे संचालक सुधन्वा रानडे, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य सुरेंद्र रानडे, वास्तुरचनाकार राजेंद्र रानडे, प्रशासकीय अधिकारी भारती न्याती तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी आदी उपस्थित होते. 
 
संग्रहालयाचे संचालक रानडे यांनी संग्रहालय निर्मितीची पाश्वर्र्भूमी आणि त्याची वैशिष्ट्ये याबाबत सविस्तर सादरीकरण केले. तसेच बावधन येथे प्रस्तावित असलेला ’म्युझियम सिटी’ प्रकल्प हा केवळ एक संग्रहालय न राहता, आंतरराष्ट्रीय दर्जाचा आणि पुणे शहराचा लौकिक जागतिक पातळीवर वाढवणारा एक पथदर्शी उपक्रम ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. 

Related Articles