भारतासह जगभर योगदिन साजरा   

आंध्रातील कार्यक्रमांचा विक्रम; गिनीज बुकमध्ये नोंद

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय योग दिन -२०२५ शनिवारी भारतापासून अमेरिकेपर्यंत जगभर अपूर्व उत्साहात साजरा झाला. नागरिकांनी योगाद्वारे केवळ शरीर आणि मन संतुलित करण्याचा संकल्प केला नाही तर निरोगी जीवनशैली स्वीकारण्याचा संदेशही विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करुन  दिला. 
 
आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत ११ व्या योगदिनाचा कार्यक्रम झाला. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याणही सहभागी झाले होते एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग, अशी यंदाच्या योगदिनाची थीम होती. जी पृथ्वी आणि मानवी आरोग्य यांच्यातील परस्परसंबंध अधोरेखित करते. विशाखापट्टणममध्ये पंतप्रधान मोदींनी तीन लाख नागरिक आणि ४० देशांतील राजदूतांसोबत योग केला. दरम्यान, आंध्र प्रदेश सरकारने योगदिनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. राज्यातील कार्यक्रमांत ५० लाखांहून अधिक जण सहभागी झाले होते. त्यांना योग प्रमाणपत्रेही वितरित करण्यात आली. सरकारने राज्यात योग आंध्र मोहीम सुरू केली आहे. त्यात दररोज योगासने करणार्‍या दहा लाख नागरिकांचा समुदाय निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. 
 
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि  मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी उपक्रमाचे कौतुक केले आणि म्हटले की केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात योग लोकप्रिय झाला आहे. ज्यामुळे तो जागतिक आरोग्य चळवळ बनला आहे. नायडू यांच्या मते, यावेळी १७५ हून अधिक देशांमध्ये १२ लाख ठिकाणी १० कोटींहून अधिक जणांनी योग दिनाच्या कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. त्यामुळे योग आता केवळ भारताची परंपरा राहिलेली नसून तो एक सार्वत्रिक सांस्कृतिक वारसा बनला आहे.
 
योग जगाला सीमा, वया पलीकडे जोडण्याचा संदेश देतो. भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये योग दिनाचा प्रस्ताव जेव्हा मांडला होता.  तेव्हा १७७ देशांनी त्याला पाठिंबा दिला होता. आज योग हा कोट्यवधी नागरिकांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. मानवतेसाठी योग २.० ची सुरुवात झाली आहे. आंतरिक शांतीचे माध्यम योगाला बनविण्यासाठी जागतिक धोरण तयार करणे आवश्यक आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी
 
 ऐतिहासिक स्थळांवर योगप्रेमी एकवटले
 
मध्य प्रदेशातील सांची स्तूप आणि ओडिशातील कोणार्क सूर्य मंदिरासह  देशभरातील १०० ऐतिहासिक आणि ५० सांस्कृतिक स्थळांवर विशेष योग सत्रांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये आसाममधील चराईदेव मोईदम, गुजरातमधील राणी की बाव आणि धोलावीरा, मध्य प्रदेशातील सांची स्तूप, ओडिशातील कोणार्क सूर्य मंदिर, महाराष्ट्रातील एलिफंटा लेणी आणि तामिळनाडूमधील बृहदेश्वर मंदिर यांचा समावेश होता. 
 
संरक्षण मंत्री सिंह यांचे जवानांसोबत योगसत्र 
 
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर येथे भारतीय लष्कराच्या जवानांसोबत योगा केला, तर केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी जोधपूरच्या मेहरानगड किल्ल्यावर योग सत्रात भाग घेतला. दिल्ली, पंजाब, लडाख, केरळ, जम्मू आणि काश्मीर आणि पश्चिम बंगालमधील वारसा स्थळांवरही नागरिकांनी योगासने केली. सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या (एआयआयए) नेतृत्वाखाली न्यायाधीश, डॉक्टर, विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांनी एकत्रितपणे योगासने केली.  एआयआयए कॅम्पसमध्ये दोन हजारांहून अधिक जणांनी भाग घेतला.
 
न्यूयॉर्कचा टाइम्स स्क्वेअरमध्ये भव्य कार्यक़्रम
 
अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअर येथे भारतीय दूतावास आणि स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने एका भव्य योग कार्यक्रमाचे आयोजित केला होता. त्यामध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.
 
 इतिहास
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ सप्टेंबर २०१४ रोजी योगदिनाचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रात मांडला.
 १७७ देशांनी प्रस्तावाला पठिंबा दिला.
 ११ डिसेंबर २०१४ रोजी २१ जून हा आंतररराष्ट्रीय योगदिन घोषित 
 पहिला आंतरराष्ट्रीय योगदिन २१ जून २०१५ रोजी साजरा

Related Articles