डॉ. शंकर अभ्यंकर यांना प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान   

साखळीपीर तालीम वसंत व्याख्यानमालेचा विशेष गौरव

पुणे : प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीच्या वतीने देण्यात येणारा प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान या वर्षी प्रसिद्ध व्याख्याते डॉ. शंकर अभ्यंकर यांना जाहीर झाला आहे. गेली ३२ वर्षे श्रवणसंस्कृती समृद्ध करण्यासाठी कार्यरत असलेल्या, साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर आयोजित वसंत व्याख्यानमालेचा यावर्षी विशेष सन्मान करण्यात येणार आहे. 
 
रोख रक्कम आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या ९८ व्या जयंती दिनी १५ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता एस. एम. जोशी सभागृहात होणार्‍या समारंभात मूर्तिशास्त्राचे गाढे अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या पुरस्काराचे हे बारावे वर्ष आहे. यापूर्वी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, डॉ. रघुनाथ माशेलकर, सिंधुताई सपकाळ, प्रा. द. मा. मिरासदार, डॉ. ह. वि. सरदेसाई, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, नरेंद्र चपळगावकर, डॉ. रामचंद्र देखणे, डॉ. यशवंत पाटणे, डॉ. अरुणा ढेरे यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे, अशी माहिती प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.   
 
प्रा. जोशी म्हणाले, महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत आणि ख्यातनाम वक्ते प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृती जपण्यासाठी प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीची स्थापना करण्यात आली. आपल्या अमोघ आणि विचारसंपन्न वक्तृत्वाच्या माध्यमातून समाजमानस समृद्ध करण्याचे काम प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी केले. जीवनाच्या सर्व क्षेत्रांत व्रतस्थ वृत्तीने काम करणार्‍या माणसांविषयी प्राचार्यांना विलक्षण आदर होता. डॉ. शंकर अभ्यंकर यांनी गेली पाच दशके व्याख्यानातून विचारजागर केला. या योगदानाबद्दल हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्याचे समितीने ठरविले आहे. 

Related Articles