सरकारला मुलांचे मानसशास्त्र कळत नाही : पानसे   

पुणे : दोन भाषांसह तिसरी भाषा पहिलीलाच मुलांवर लादणे हा सरकारचा मूर्खपणा आहे.  त्यांना मुलांचे शिक्षण, मेंदू, मानसशास्त्र कळत नाही, असे जर आपले राजकीय पुढारी कर्ते करविते झाले तर देशाचे फार काही बरे होईल असे वाटत नाही. देशामध्ये मुले रोज शाळेत जातात असे, आदर्श वातावरण असले तरी ६५ टक्के विद्यार्थी तिसरी-चौथीत जाऊन ही पुरेसे लेखन वाचन त्यांना येत नाही. हा पायाभूत पातळीवरचा फार मोठा प्रश्न आहे, असे मत प्रख्यात बालशिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे यांनी व्यक्त केले.
 
रोटरी क्लब पर्वती, पुणे तर्फे उत्कृष्ट कृतज्ञता पुरस्कार रमेश पानसे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी रोटरी क्लब ऑफ पर्वतीच्या अध्यक्षा डॉ. वृषाली खिरे, सचिव मानसी कर्‍हाडकर, ज्ञान प्रबोधिनीचे गिरीश बापट, श्री देव देवेश्वर संस्थानचे मुख्य विश्वस्त रमेश भागवत उपस्थित होते. 
 
रमेश पानसे म्हणाले, लहान मुलांचे शालेय शिक्षणाचे शास्त्रीय महत्त्व वेगाने समजू लागले आहे. शास्त्रीय बाल शिक्षणात जास्तीत जास्त गुंतवणूक फायद्याची असते असेही त्यांनी सांगितले. शालेय काळ हा मुलांची प्रतिभा वृद्धिंगत करण्याचा काळ असतो. जेव्हा त्या काळात मुलांना काहीच मिळत नाही अशी मुले मागासलेली राहतात.
 
गिरीश बापट म्हणाले,  मुलांचा सर्वांगीण विकास होईल अशा पद्धतीचे शिक्षण त्यांना द्यायला पाहिजे. बालशिक्षणातील हिरकणी हा प्रयोग सध्या ज्ञान प्रबोधिनीच्या माध्यमातून सुरू आहे.  घरातील वस्तू वापरून कसे शिक्षण देता येईल, हे मातेला सांगितले जाते. अशा वेगवेगळ्या माध्यमातून  बालशिक्षण प्रयोग केले जात आहेत.
 

Related Articles