जम्मू-काश्मीरमधील तीन हॉटेल्सवर ईडीची कारवाई   

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमधील ‘पटनीटॉप’ या प्रसिद्ध पर्यटन स्थळ येथील तीन हॉटेल्सवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शनिवारी जप्तीची कारवाई केली.या तिन्ही हॉटेल्सची बाजारभावानुसार एकूण किंमत १५.७८ कोटी आहे. हॉटेल्स, गेस्ट हाऊस, रिसॉर्ट्सचे मालक आणि संचालक तसेच पटनीटॉप डेव्हलपमेंट अथॉरिटी (पीडीए) च्या अधिकार्‍यांविरुद्ध केंद्रीय गुप्तचर विभागाने दाखल केलेल्या (सीबीआय) एफआयआरवरून ईडीकडून चौकशी सुरू आहे. पटनीटॉप हे हिल स्टेशन असून उधमपूरपासून ४७ किमी आणि जम्मूपासून ११२ किमी अंतरावर आहे. या ठिकाणी वर्षभर पर्यटकांची मोठी गर्दी असते. हॉटेल पाइन हेरिटेज, हॉटेल ड्रीम लँड आणि हॉटेल शाही संतूर यांच्याविरुद्ध आर्थिक अफरातफर प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) ही कारवाई करण्यात आली. जानेवारीमध्ये हॉटेल त्रिनेत्र रिसॉर्टस आणि हॉटेल ग्रीन ऑर्किडवर ईडीने जप्तीची कारवाई केली होती. या हॉटेल्सची किंमत १४.९३ कोटी आहे.

Related Articles