इराणवरील हल्ल्याचा निर्णय दोन आठवड्यांत : ट्रम्प   

राजनैतिक चर्चेचा  प्रस्तावही मांडला

वॉशिंग्टन : इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष शुक्रवारी आठव्या दिवशी सुरूच आहे. दोन्ही देशांचे एकमेकांवर हवाई हल्ले सुरूच आहेत. आता अमेरिकेने देखील युद्धात उडी घेण्याचा विचार सुरू केला आहे. याबाबतचा निर्णय दोन आठवड्यांत घेतला जाईल, असे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी जाहीर केले. तसेच नवीन राजनैतिक चर्चेेचे प्रयत्न सुरू केले जातील, असेही म्हटले आहे. 
 
इराणचा भूमिगत फार्डो अणु प्रकल्प आहे. तेथे  अणुबाँबची निर्मिती केली जात असल्याचा आरोप इस्रायलचा आहे. प्रकल्प पर्वतीय भागात आणि जमिनीत खोलवर आहे. त्यामुळे तो नष्ट करण्याची धडपड इस्रायलकडून सुरू आहे. त्यासाठी अमेरिकन बनावटीच्या बंकर बस्टर बाँबची गरज आहे. त्याची मागणी सातत्याने इस्रायलने अमेरिकेकडे केली आहे. फोर्डो अणुप्रकल्पावर बस्टर बाँब टाकण्यासाठी अमेरिकन बनावटीच्या बी २ बाँबर विमानांचा वापर करण्याची योजना अमेरिकेची आहे. त्यामुळे त्याबाबतचा निर्णय दोन आठवड्यांत घेतला जाणार असल्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. असा निर्णय घेतल्यास अमेरिकेचे लष्कर युद्धात सहभागी होणार आहे. दरम्यान, तेहरानने आपल्या अणु कार्यक्रमाबाबत फेरविचार करावा आणि कराराबाबत चर्चा करावी, असा नवा प्रस्तावही ट्रम्प यांनी ठेवला आहे. दरम्यान, आता कोणतीही चर्चा होणार नसल्याचे इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरघाची यांनी काल स्पष्ट केले आहे. त्यामुळे इराणबरोबरचा अमेरिकेचा संघर्ष आणखी चिघळणार असल्याचे चित्र आहे. 
 
खामेनी यांना पुन्हा हत्येची धमकी
 
सोरोका येथील रुग्णालयावरील हल्ल्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांना ठार मारण्याची धमकी इस्रायलने दिली आहे. अगोदरपासून खामेनी यांना ठार करण्याची धडपड इस्रायलकडून सुरू आहे. त्याची योजना अमेरिकेला सादर केली होती. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी हत्येस विरोध केला होता. योजना जगजाहीर झाल्यानंतर आणि अमेरिकेच्या दबावामुळे इस्रायलने एक पाऊल मागे घेतले, अशी चर्चा सुरू झाली होती. नेतन्याहू यांनी पुन्हा धमकी दिली आहे. 
 
आधी लग्न इराणचे, मग मुलाचे : नेतन्याहू 
 
सोरोका रुग्णालयावरील हल्ल्यानंतर माझे वैयक्तिक कौटुंबिक नुकसान झाले, असे उद्गार इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी काढले आहेत मात्र, त्याचे उद्गार अनेक इस्रायली नागरिकांना आवडलेले नाहीत. विधान स्वकेंद्रित आणि मवाळ असल्याची टीका त्यांनी केली. इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यातील रुग्णालयाच्या नुकसानीची पाहणी त्यांनी केली. त्या वेळी ते बोलत होते. हल्ल्यात २०० पेक्षा अधिक इस्रायली रुग्ण जखमी झाले होते. दरम्यान, नेतन्याहू यांचा मुलगा अन्वर याचे लग्न होते. ते सुरक्षेच्या कारणामुळे पुढे ढकलावे लागल्याची खंत नेतन्याहू यांनी व्यक्त केली. या वेळी दुसर्‍या महायुद्धात ब्रिटनवर कोसळलेल्या आपत्तीची आठवणी ताज्या झाल्याचे म्हटले आहे. मुलाचे लग्न दुसर्‍या वेळी पुढे ढकलावे लागले. त्यामुळे कुटुंबाने मोठा त्याग केला. पत्नी सारा निराश झाली नाही. ती धीराने सामोरी गेली, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले. मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे देखील वैयक्तिक नुकसान झाले, असेही ते म्हणाले. 

Related Articles