देशातील बहुतेक संस्थांमध्ये एआय प्रमुखांच्या नेमणुका   

मुंबई : अ‍ॅमेझॉन वेब सर्व्हिसेसने ऍक्सेसच्या  सहकार्याने जनरेटिव्ह एआय विषयक अभ्यास प्रसिद्ध केला.  यात असे दिसून आले, की २०२४ मध्ये भारतात जनरेटिव्ह एआयचे अंगीकरण मोठ्या प्रमाणावर वाढले.  यातील मुख्य निष्कर्ष म्हणजे भारतातील ८३ टक्के संस्थांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा स्वीकार वेगाने करण्यासाठी व  त्याच्या अंमलबजावणीतील गुंतागुंत हाताळण्यासाठी ‘चीफ एआय ऑफिसर’ या स्वतंत्र कार्यकारी अधिकार्‍याची नियुक्ती केली आहे. आणखी १५ टक्के संस्था २०२६ पर्यंत अशी नियुक्ती करण्याची योजना आखत आहेत. सध्या बहुतांश जनरेटिव्ह एआय नवोपक्रमांचे नेतृत्व मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य तंत्रज्ञान अधिकारी व मुख्य नवोपक्रम अधिकारी करत असले तरी, नेतृत्व संरचना आता नव्या गरजांनुसार बदलत आहेत आणि एआय कौशल्य असलेल्या प्रतिभावान व्यक्तींसाठी संस्थांच्या उच्च पदांवर नवीन करिअर संधी निर्माण करत आहेत. २०२५ साठी संस्थांच्या अंदाजपत्रकात जनरेटिव्ह एआयला सर्वोच्च प्राधान्य (६४ टक्के) देण्यात आले आहे, त्यानंतर सुरक्षेला (२१ टक्के) आणि संगणक क्षमतेला (१० टक्के) प्राधान्य दिले गेले आहे.  या अहवालानुसार भारतामध्ये जनरेटिव्ह एआयचा स्वीकार जवळपास सार्वत्रिक झाला आहे. ९८ टक्के संस्था जनरेटिव्ह एआय साधनांचा वापर करत आहेत. त्यापैकी ९५ टक्के संस्था नव्या उपयोगांच्या शोधासाठी सक्रिय प्रयोग करत आहेत. या प्रयोगांपैकी ४९ टक्के प्रयोग साल २०२५ मध्ये प्रत्यक्ष उत्पादनाच्या टप्प्यावर येण्याची अपेक्षा आहे. एडब्ल्यूएस इंडिया आणि दक्षिण आशियाचे सोल्युशन आर्किटेक्चर प्रमुख सतिंदर पाल सिंग म्हणाले, भारताच्या संदर्भात केवळ तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करणे एवढाच एआयचा उपयोग मर्यादित नाही. ग्राहकांचा अनुभव नव्याने घडवण्यासाठी, कार्यपद्धती पुन्हा रचण्यासाठी आणि सतत नवोपक्रमाची मानसिकता विकसित करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा एक प्रभावी घटक म्हणून वापर केला जात आहे.

Related Articles