खरी शिवसेना कोणती ते शिंदे यांनी दाखवून दिले : शहा   

मुंबई, (प्रतिनिधी) : वर्धापन दिनाच्या निमित्ताने शिवसेनेतील दोन गटांत आरोप-प्रत्यारोपांची धुळवड सुरू असतानाच भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी, शिंदे यांनी खरी शिवसेना कोणती आहे, ते दाखवून दिल्याचे सांगत त्यांची प्रशंसा केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख करताना, ज्यांनी खरी शिवसेना कोणाची याची ओळख सर्वांना करून दिली ते एकनाथ शिंदे असा उल्लेख शहा यांनी केला. उद्धव ठाकरे गटाकडून यावर कोणती प्रतिक्रिया येते, याकडे आता लक्ष लागले आहे.
 
अमित शहा हे मुंबईत होते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथील महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या कार्यक्रमात भाषण करायला शहा उभे राहिले. सुरूवातीला त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि माझे मित्र देवेंद्र फडणवीस असा उल्लेख केला. त्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि ज्यांनी खरी शिवसेना कोणाची याची ओळख सर्वांना करून दिली असे एकनाथ शिंदे असा उल्लेख केला. शिंदे यांची शिवसेना खरी असल्याचे सांगत शहा यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेनेचा ५९ वा वर्धापनदिन नुकताचा साजरा करण्यात आला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिकास्त्र सोडले होते. शहा यांच्यावर पक्ष फोडल्याचे आरोप केले होते.

Related Articles