अंतराळ स्थानकात शुभांशू दाखल   

नवी दिल्ली : भारताचे अवकाशवीर शुभांशू शुक्ला आणि इतर तीन अवकाशवीर २८ तासांच्या प्रवासानंतर गुरुवारी दुपारी ४ वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात दाखल झाले. हे चारही अवकाशवीर १४ दिवस आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात राहणार आहेत. या कालावधीत ते  तेथील प्रयोगशाळेत विज्ञान, शिक्षण आणि व्यावसायिक असे ६० प्रयोग करणार आहेत.भारताचे पहिले अवकाशवीर राकेश शर्मा हे तत्कालीन सोव्हिएत महासंघाच्या मोहिमेद्वारे १९८४ मध्ये अंतराळात गेले होते. तेथे ते आठ दिवस होते. त्यानंतर, ४१ वर्षांनी शुक्ला हे अंतराळात जाणारे दुसरे भारतीय तर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले भारतीय अवकाशवीर आहेत. 
 
भारतीय प्रमाणवेळेनुसार, बुधवारी दुपारी १२.०१ मिनिटांनी ‘अ‍ॅक्सिओम-४’ मोहिमेअंतर्गत अमेरिकेतील फ्लोरिडा येथील नासाच्या जॉन. एफ. केनेडी अवकाश केंद्रावरून शुभांशू आणि अन्य तीन अवकाशवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या दिशेने स्पेस एक्स फाल्कन ९ रॉकेटच्या माध्यमातून झेपावले होते. 
 
शुभांशू यांच्यासोबत अमेरिकेच्या अनुभवी अंतराळवीर मिशन कमांडर पेगी व्हिटसन, पोलंडचे स्लावोस उझनान्स्की-विस्निव्स्की आणि हंगेरीचे टिबोर कापू आहेत. अंतराळात पोहोचताच अवकाशवीरांनी त्यांच्या कुपीला ‘ग्रेस’ नाव दिले आहे. प्रक्षेपणाच्या १० मिनिटांनी अंतराळवीरांनी पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात केली होती. सुमारे २८ तासांनंतर काल ते अंतराळ स्थानकात पोहोचले. त्यानंतर, शुभांशू यांनी चित्रफितीच्या माध्यमातून संदेश पाठविला. 
 

Related Articles