‘भारतीय नाट्य कलेचा वारसा’ विषयावर शनिवारी व्याख्यान   

हेरिटेज वॉक उपक्रम 

पुणे : ’टिळक महाराष्ट्र विद्यापीठ’, ‘केसरी’ आणि ’हेरिटेज इंडिया कम्युनिकेशन्स प्रा. लि’ यांच्या संयुक्त विद्यमाने हेरिटेज वॉक हा उपक्रम दर महिन्यात आयोजित होतो. हा उपक्रम नि:शुल्क असून श्री बालमुकुंद लोहिया संस्कृत आणि भारतीयविद्या अध्ययन केंद्राच्या सहकार्याने चालवण्यात येतो. सध्याच्या पावसाळी हवामानाचा विचार करून या महिन्यातील हेरिटेज वॉक हा वारसा विषयक व्याख्यानामध्ये रूपांतरित करण्यात आला आहे. 
 
हा उपक्रम शनिवारी सायंकाळी ५ वाजता टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या सदाशिव पेठ येथील संकुलातील पहिल्या मजल्यावरील सभागृहात होणार आहे. या महिन्यात ‘भारतीय नाट्य कलेचा वारसा’ या विषयावर टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या साहित्य आणि ललित विद्याशाखेच्या अधिष्ठाता प्रा. डॉ. मंजुषा गोखले या व्याख्यान देतील. भारतीय नाट्यकलेचे मूळ वैदिक काळात सापडते. नाट्यकलेचे शास्त्रीय आणि पद्धतशीर विवेचन करणारा पहिला ग्रंथ म्हणजे भरताचे नाट्यशास्त्र. साधारण सनपूर्व दुसरे ते इसवी सनाचे दुसरे शतक हा या ग्रंथाचा काळ मानला जातो. 
 
नाट्याची दोन अंगे म्हणजे संहिता आणि प्रयोग. या दोन्हीमध्ये येणार्‍या प्रत्येक विषयाचा परामर्श भरतमुनींनी घेतला आहे. संगीत आणि नृत्य या मुळात नाट्य कलेमध्येच अंतर्भूत असलेल्या कला. या तीनही कलांचा एकत्र आणि स्वतंत्र असा विकास प्राचीन कालापासून आजतागायत आपल्याला दिसतो. या सगळ्या कलांच्या क्षेत्रामध्ये भरतमुनींच्या नाट्यशास्त्राचा आणि प्राचीन नाट्यकलेचा वारसा अखंडपणे प्रवाहित होताना दिसतो. अगदी आधुनिक काळातही भरताच्या नाट्यशास्त्राचा अभ्यास करून कालानुरूप नाट्यप्रयोग देशभरात सादर करीत असल्याचे दिसून  येते. तसेच प्राचीन नाट्यकलेच्या वारशाला उजाळादेखील दिला जातो. यातच या भारतीय वारशाचे महत्त्व अधोरेखित होते.
 
या वर्षीच पुण्यातील भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिरातील १८७३-७४  साली दाखल झालेल्या नाट्यशास्त्राच्या हस्तलिखि-ताचा समावेश युनेस्कोच्या ‘मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर’ मध्ये झाला आहे. या व्याख्यानात प्रा. गोखले या सर्व प्रकारच्या वारशाचा सविस्तर आढावा घेतील.

Related Articles