अर्थ काय समजायचा तो समजा : शरद पवार   

बारामती, (प्रतिनिधी) : सूचना असल्याशिवाय कर्मचारी बँक कशाला उघडेल? लोकसभा निवडणुकीच्या वेळीही अशीच घटना घडली होती. आता पुन्हा तीच गोष्ट दुसर्‍यांदा घडते आहे. याचा अर्थ काय समजायचा तो समजा, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे सरकार व बँक प्रशासनावर टीका केली.माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बळीराजा सहकार बचाव पॅनलचे उमेदवार राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांना भेटण्यासाठी गेले असताना त्यांना मार्गदर्शन करताना शरद पवार बोलत होते.  
 
पवार पुढे बोलताना म्हणाले,  कारखान्याच्या निवडणूक प्रक्रियेत ज्या घटना घडत आहेत ते कारखान्याच्या हितासाठी सभासदांच्या अर्थकारणासाठी आणि शेतकर्‍यांच्या भल्यासाठी होत असलेल्या घटना अनुचित आहेत, तर एका बाजूला प्रचंड मोठी ताकद आहे. तुमच्या बाजूला सभासदांचा पाठिंबा आहे, त्यामुळे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. सर्वसामान्यांच्या हिताचा केला जाणारा विकास आणि शेतकर्‍यांचे हित याच्याशी मी कधीही तडजोड करणार नाही, असे देखील पवारांनी बोलताना व्यक्त केले.
 
शहरातील आमराई परिसरातील जिल्हा बँक सोमवार (१७ जून) रोजी रात्री तब्बल ११ वाजेपर्यंत उघडी होती. या संदर्भात ‘सहकार बचाव पॅनल’ने बँकेत मतदार यादी आढळल्याचा दावा केला असून, ही बाब निवडणुकीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे, असे मत रंजन तावरे यांच्या नेतृत्वाखालील या पॅनलने मांडले आहे.मतदार यादीमध्ये फेरफार करून निवडणुकीवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत, कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, पीडीसीसी बँकेचे पदाधिकारी किंवा प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. 

Related Articles