तरुणांनी समाजमाध्यमांच्या आहारी जाऊ नये : डॉ. काळकर   

पुणे : कुटुंबव्यवस्था आणि मूल्याधिष्ठीत जीवन पद्धती ही भारतीयांची ओळख आहे. या दोन मूल्यांच्या जोरावर आपण संपूर्ण जगाला आव्हान देऊ शकतो. याची जगाला जाणीव असल्यानेच भारताची सृजनशील क्रयशक्ती समाज माध्यमांमध्ये अडकवून ठेवणे आणि समाज माध्यमाद्वारे त्यांची जीवनदृष्टी कलुषित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर तरुणांनी समाजमाध्यमांच्या आहारी जाऊ नये, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी केले.
 
श्री पूना गुजराती बंधू समाजातर्फे दहावी-बारावीत उत्तम गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांच्या गौरव जयराज स्पोर्टस् अँड कन्व्हेन्शन सेंटरच्या देसाई बँक्वेट हॉलमध्ये पार पडला. त्यावेळी डॉ. काळकर बोलत होते. यावेळी श्री पूना गुजराती बंधू समाजाचे अध्यक्ष नितीन देसाई, कार्यकारी संचालक राजेश शहा, सह कार्यकारी संचालक नैनेश नंदू, उपाध्यक्ष वल्लभ पटेल, सचिव राजेंद्र शहा, खजिनदार हरेश शहा आदी उपस्थित होते. 
 
डॉ. काळकर म्हणाले, समाज माध्यमे तुमची विचार प्रक्रिया खुंटीत करून टाकतात. तुमच्या विचारांची दिशा भरकटवून तुमचे विचारविश्व प्रदूषित करीत असतात. आपण कसे जगायचे, कोणत्या दिशेने विचार करायचा याला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे दिशा देण्याचे काम समाजमाध्यमे करीत असतात. तंत्रज्ञान आपल्यासाठी आहे, आपण तंत्रज्ञानासाठी नाही, याची जाणीव प्रत्येक तरुणाने ठेवली पाहिजे. करिअरच्या नवीन कोणत्या वाटा चोखाळायच्या या बाबतीत पालक आणि शिक्षक मार्गदर्शन करीत असतात. मात्र, अंतिम निर्णय हा मुलामुलींनाच घ्यायचा असतो. 
 
नितीन देसाई म्हणाले, गुजराती समाज हा उद्योजकांचा समाज म्हणून सुपरिचित आहे. उद्योग जगतात सचोटीने काम करीत नाव कमावलेले अनेक जण आपल्या समाजात आहेत. भविष्यात उद्योगाला शिक्षणाची जोड देत बुद्धिजीवी क्षेत्रात देखील आपल्या समाजाची उदाहरणे प्रस्थापित केली पाहिजे. राजेश शहा यांनी प्रास्ताविक केले. अनुजा सेलोत यांनी सूत्रसंचालन केले.

Related Articles