ज्ञानेश्वर माऊलींचे मानाचे अश्व श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या चरणी   

पुणे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीतील मानाच्या अश्वांनी हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी भाविक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली.अंकली (कर्नाटक) येथील श्रीमंत शितोळे सरकार यांचे अश्व अंकली येथून पायी येऊन दरवर्षी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीत सहभागी होत असतात. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात या दोन अश्वांना मानाचे स्थान असते.
 
उद्या (दिनांक १९ जून) ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थान ठेवण्यात येणार असून या पालखी सोहळ्यात हे दोन्ही अश्व सहभागी होऊन पंढरपूरपर्यंत जात असतात. वारकरी संप्रदायात १८३२ पासूनची ही समृद्ध परंपरा आहे. पालखी सोहळा मार्गस्थ झाल्यानंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या रथापुढे जो अश्व असतो तो माऊलींचा अश्व असतो तर जरीपटका घेऊन अश्वस्वार असतो तो स्वाराचा अश्व असतो. असे हे दोन अश्व पालखी सोहळ्यात सहभागी होत असतात. 
 
अंकली येथील शितोळे राजे यांच्याकडे या अश्वांची ही मानाची परंपरा आहे. मंगळवारी या अश्वांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टकडून श्रीमंत उर्जितसिंह राजे शितोळे सरकार, श्रीमंत महादजीराजे शितोळे सरकार यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. ट्रस्टचे अध्यक्ष श्री संजीव जावळे यांच्यासह विश्वस्त, भाविक आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. 

Related Articles