स्मृतीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा विजय   

नॉटिंघम : भारतीय महिला संघाने इंग्लंड दौर्‍याची सुरुवात एकदम धमाक्यात केली आहे. नॉटिंघमच्या ट्रेंट ब्रिजच्या मैदानातील सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाने यजमान इंग्लंड संघासमोर २११ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना इंग्लंड महिला संघ १५ व्या षटकातच ११३ धावांवर आटोपला. भारतीय संघाने ९७ धावांसह सामना जिंकत ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. घरच्या मैदानात खेळताना २०० पारच्या लढाईत निर्धारित २० षटकेही  न टिकणं ही इंग्लंडच्या संघावर ओढावलेली मोठी नामुष्कीच आहे.    
 
भारतीय संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची कर्णधार नॅटली सायव्हर हिच्याशिवाय अन्य कोणत्याही बॅटरला मैदानात तग धरता आली नाही. नॅटलीनं ४२ चेंडूत १० चौकाराच्या मदतीने  ६२ धावांची खेळी केली.  स्मृती मानधनाच्या शतकी खेळीनंतर भारतीय गोलंदाजीत भा श्री चारनी हिने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. दीप्ती शर्मा आणि राधा यादव यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. अमनज्योत कौर आणि अरुंधती रेड्डी यांनीही आपल्या खात्यात प्रत्येकी एक विकेट जमा केली. 
 
नॉटिंघमच्या ट्रेंट ब्रिजच्या पहिल्या टी-२० सामन्यात इंग्लंडची कर्णधार नॅटली सायव्हर हिने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दुसरीकडे हरमनप्रीत कौरच्या अनुपस्थितीत स्मृती मानधना कार्यवाहून कर्णधाराच्या रुपात मैदानात उतरली. नाणेफेक गमावल्यावर पहिल्यांदा फलंदाजी करण्याची वेळ आल्यावर स्मृतीनं शफाली वर्माच्या साथीनं भारतीय संघाच्या डावाची सुरुवात केली. दोघींनी पहिल्या विकेटसाठी ७७ धावांची भागीदारी रचली. बर्‍याच दिवसांनी कमबॅक करणारी शफाली २२ चेंडूत ३ चौकाराच्या मदतीने २० धावा काढून माघारी फिरली. त्यानंतर  स्मृतीनं  तिसर्‍या विकेटसाठी हरलीन देओलसोबत ९४ धावांची भागीदारी रचत संघाला आणखी मजबूत स्थितीत नेले. हरलीन देओल हिने २३ चेंडूत ७ चौकाराच्या मदतीने ४३ धावांची दमदार खेळी साकारली.  रिचा घोष  ६ चेंडूत १२ धावा करून परतल्यावर तिच्या जागी मैदानात उतरलेल्या जेमिमा रॉड्रिग्सला खातेही उघडता आले नाही. स्मृती मानधना शेवटच्या षटकातील दुसर्‍या चेंडूवर झेलबाद झाली. तिने ६२ चेंडूत १५ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने केलेल्या ११२ धावांच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने निर्धारित २० षटकात ५ विकेट्सच्या मोबदल्यात २१० धावा केल्या. ही भारतीय महिला संघाची आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील दुसर्‍या क्रमांची सर्वोच्च धावसंख्याही ठरली. इंग्लंड महिला संघाविरुद्धच्या सामन्यात भारतीय महिला संघाने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये तिसर्‍यांदा २०० पेक्षा अधिक धावा केल्या. याआधी दाम्बुलाच्या मैदानात युएई विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने ५ बाद २०१ धावसंख्या उभारली होती. याशिवाय मुंबई येथील डीवाय पाटील स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात वेस्ट इंडिजच्या संघाविरुद्ध ४ विकेट्सच्या मोबदल्यात २१७ धावा केल्या होत्या. ही भारतीय महिला संघाची टी-२० क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या आहे.

Related Articles