तेजीच्या लाटेवर बाजार स्वार   

धनंजय दीक्षित 

गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी!
 
दिवस तेजीचे सुरु जाहले
पैसा आला बैल माजले
शेअरधारीही प्रसन्न झाले
छन खळ खळ छन
ढुम ढुम पट ढुम
निफ्टी चाले जोरात
 
22 जूनच्या रात्री अमेरिकेने इराणच्या अण्वस्त्र निर्मिती स्थळांवर जोरदार हल्ले केले व ट्रम्प यांनी जाहीर करून टाकले, की इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम आता संपूर्णपणे नष्ट झाला. 24 तारखेला त्यांनी इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध विराम झाल्याचीही घोषणा केली. शेअर बाजार आणि तेजी यामध्ये ‘आखातातले युद्ध’ ही एकच मोठी अडचण होती व ती नाहीशी झाल्यावर तेजीवाले अक्षरशः उधळले आणि तेजी येणासाठी बाकी पूरक गोष्टी म्हणजे, राजकीय आणि आर्थिक स्थैर्य, बळकट अर्थव्यवस्था, कुशल मनुष्यबळ, मोठी बाजारपेठ, प्रगत शेअर बाजार इ. एकत्र मिळण्याचे ठिकाण सद्यःस्थितीत भारत सोडून खचितच दुसरीकडे सापडेल, त्यामुळे गुंतवणुकीचा ओघ आपल्या शेअर बाजाराकडे वळला तर त्यात नवल ते काय?
 
निफ्टी 25,000 ची मानसिक पातळी ओलांडेल, की नाही यावर बर्‍याच चर्चा सर्वच व्यावसायिक वृत्तवाहिन्यांवर आत्तापर्यंत सुरु होत्या... ती पातळी अखेर निफ्टीने 24 तारखेला ओलांडली आणि नंतर 25,000 च्या खाली बंद भाव काही लावला नाही. ही तेजीची व्याप्ती फक्त निर्देशांकातील 50 शेअरपर्यंतच मर्यादित नव्हती, तर लार्जकॅप मिडकॅप स्मॉलकॅप या सर्व कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ दिसून आली. 30 तारखेला म्हणजेच आज, जून महिना संपतो आहे. आता बाजाराला जून अखेर संपलेल्या तिमाहीचे आर्थिक निकाल कसे असतील याची उत्कंठा लागून राहिली असेल. 
 
हिंदीमध्ये एक छान वाक्प्रचार आहे... सावन के अंधे को हरियाली दिखती है ज्याचा मोघम अर्थ असा, की जर एखादी गोष्ट चांगली आहे ही भावना मनात ठेवून तिच्याकडे बघितले तर ती तेवढी चांगली नसेल, तरीही आपल्याला चांगलीच वाटते. आता कंपन्यांचे निकाल लागल्यावर बाजार त्याकडे या उक्तीनुसार पाहतो अथवा नाही ते पुढील आठवड्यापासून आपल्या समोर येईलच. एक मात्र नक्की. आपल्या शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करण्याकरिता जोपर्यंत गुंतवणूकदार संधीच्या प्रतीक्षेत आहेत तोपर्यंत बाजारात मोठ्या प्रमाणावर पडझड होईल असे आत्ता तरी वाटत नाही.

Related Articles