थकीत एफआरपी प्रश्नी ८ कारखान्यांवर जप्तीचा हातोडा   

हर्षवर्धन पाटील यांच्या कारखान्यावरही जप्ती

पुणे : राज्यातील संपलेल्या ऊस गाळप हंगामातील (२०२४-२५) शेतकर्‍यांची एफआरपीची सुमारे ५७ कोटी ३२ लाखांची रक्कम थकीत ठेवल्याप्रकरणी साखर आयुक्त सिद्धराम सालीमठ यांनी ८ कारखान्यांवर महसुली वसुली प्रमाणपत्रानुसार (आर.आर.सी.) जप्तीचे आदेश संबंधित जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत. त्यामध्ये राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील हे अध्यक्ष असलेल्या पुणे जिल्ह्यातील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचा समावेश आहे. याखेरीज, सोलापूरातील ३, अहिल्यानगर, जालना, यवतमाळ, बुलढाणा या जिल्ह्यांतील प्रत्येकी १ साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई होणार आहे. 
 
थकीत एफआरपी रकमेवर १५ टक्के दराने देय होणारे व्याज कारखान्यांकडून जमीन महसुलाची थकबाकी समजून कारखान्याने उत्पादित केलेली साखर मोलॅसिस आणि बगॅस इत्यादी उत्पादनाची विक्री करून त्यामधून वसूल करण्यात यावी. साखर साठा बँकेकडे तारण असल्यास तारण नसलेली कारखान्यांची जंगम व स्थावर मालमत्ता जप्त करून त्यामधून ही रक्कम वसूल करण्यात यावी. शेतकर्‍यांना एफआरपीची रक्कम विलंबतेने देताना त्या कालावधीसाठी १५ टक्के व्याजासह देण्यासाठी स्थानिक जिल्हाधिकार्‍यांना कारवाई करण्यास प्राधिकृत करण्यात आले आहे.दरम्यान, साखर आयुक्तालयाने हंगाम २०२४-२५ मध्ये थकीत एफआरपीप्रश्नी आतापर्यंत २८ साखर कारखान्यांवर जप्तीच्या कारवाईचे आदेश दिले आहेत. ही थकीत रक्कम सुमारे ५४५ कोटी ८८ लाख ७८ हजार असल्याची माहिती साखर आयुक्तालयातून देण्यात आली.
 
यांच्यावर कारवाई
 
शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना (इंदापूर) ८ कोटी ५८ लाख ५४ हजार, भैरवनाथ शुगर वर्क्स (लवंगी, ता.मंगळवेढा)  १ कोटी २७ लाख ५४ हजार, भैरवनाथ शुगर वर्क्स (आलेगाव, ता.माढा) २ कोटी ९५ लाख ९ हजार, भीमा सहकारी साखर कारखाना (टाकळी सिकंदर) १ कोटी २६ लाख, केदारेश्वर सहकारी साखर कारखाना (पाथर्डी, सोलापूर) २५ कोटी ७६ लाख ५ हजार, समृद्धी शुगर्स (रेणुकानगर, ता. घनसांगव)  १३ कोटी ६३ लाख ४२ हजार, डेक्कन शुगर्स प्रा.लि. (मंगलोर) १ कोटी ११ लाख ९ हजार, पेनगंगा शुगर प्रा.लि. (वरुडधाड) २ कोटी ७४ लाख ९ हजार 

Related Articles