उधमपूरमध्ये ‘जैश’च्या तीन दहशतवाद्यांचा शोध   

जम्मू : जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यातील बसंतगढच्या जंगलात जैश-ए-महमदच्या तीन दहशतवाद्यांचा सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकाकडून दोन दिवसांपासून शोध सुरू आहे, असे अधिकार्‍यांनी शुक्रवारी सांगितले.सुरक्षा दलाबरोबरील चकमकीत गुरुवारी एक दहशतवादी ठार झाला होता. तर, अन्य तिघांना सुरक्षा दलाने घेराव घातला आहे. दहशतवाद्यांचा ड्रोनच्या साहाय्यानेदेखील शोध सुरू आहे. याशिवाय, श्वान पथकदेखील त्यांचा शोध घेत आहेत.
 
परवा सकाळी बसंतगढच्या दुर्गम बिहारी भागात सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकाबरोबर दहशतवाद्यांची चकमक उडाली होती. करुर नाल्याजवळ चारही दहशतवादी लपलेले होते. त्यावेळी चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. या दहशतवाद्याची ओळख पटली असून हैदर असे त्याचे नाव आहे. दहशतवादी जंगले आणि गुहांचा लपण्यासाठी वापर करत असल्याचे तपासणीत पुढे आले.
 
गेल्या काही दिवसांत दहशतवाद्यांना अन्न आणि आश्रय देणार्‍या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. २५ एप्रिल रोजी बसंतगढ परिसरात दहशतवाद्यांबरोबरील चकमकीत लष्कराचा एक जणांना शहीद झाला होता. त्याआधी, ९ एप्रिल रोजीदेखील चकमक उडाली होती. मागील वर्षी ११ सप्टेंबर रोजी याच परिसरात जैश-ए-महमदशी संबंधित दोन दहशतवादी ठार झाले होते.
 

Related Articles