षटकारानंतर मैदानावरच कोसळला हरजीत   

हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; फिरोजपूरमधील दुर्दैवी घटना

फिरोजपूर : क्रिकेटमध्ये फिफ्टी गाठल्याचा आनंद साजरा करत असतानाच एक युवक मैदानात कोसळून मरण पावल्याची हृदयद्रावक घटना पंजाबच्या फिरोजपूरमध्ये घडली. रविवारी सकाळी डीएव्ही शाळेच्या मैदानावर क्रिकेटचा सामना सुरू असताना ३५ वर्षीय हरजीत सिंगने फिफ्टी पूर्ण करण्यासाठी सिक्स लगावला आणि मैदानातच कोसळला. सहकार्‍यांनी तत्काळ मदतीचा प्रयत्न केला, मात्र रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
 
ही संपूर्ण घटना व्हिडिओत कैद झाली असून, समाज माध्यमावर ती व्हायरल होत आहे. हरजीतचा मित्र रचित सोढी म्हणाला, त्याने ४९ धावा पूर्ण केल्या होत्या. गोलंदाजाला पुढे येत सिक्स मारून फिफ्टी पूर्ण केली. आम्ही सर्वजण आनंदात होतो. तो माझ्याकडे येऊन हात मिळवण्यासाठी वळला, पण अचानक त्याचे पाय डगमगले आणि तो तोंडावर कोसळला.
 
खेळाडूंनी तातडीने सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, हरजीत शुद्धीवर आला नाही. लगेच त्याला रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणीनंतर मृत घोषित केले. प्राथमिक अहवालानुसार, हरजीतला हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता.हरजीत सिंग विवाहित होता. त्याच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा आहे. कुटुंबीयांवर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला आहे. स्थानिक समाजात या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. परिसरातील नागरिक आणि क्रीडाप्रेमींनी हरजीतसाठी श्रद्धांजली वाहिली.
 

Related Articles