बुमराची गोलंदाजी पाहण्याची सचिनला उत्सुकता   

लीड्स : रोहित शर्मा व विराट कोहलीशिवाय पहिल्यांदाच भारतीय संघ इंग्लंडच्या दौर्‍यावर गेला असून पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताच्या नव्या फळीच्या शिलेदारांचा कस लागण्याची शक्यता आहे. शुबमन गिलकडे कसोटी संघाचे नेतृत्व आहे. भारताच्या यंग ब्रिगेडची कामगिरी कशी होईल, याकडे तमाम भारतीय क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असतानाच या मालिकेत भारताचा हुकमी एक्का म्हणजेच भरवशाचा आणि अनुभवी बुमरा हे मालिकेचे प्रमुख आकर्षण ठरण्याची शक्यात आहे. भारतासह जगभरात बुमराचे चाहते आहेत. या मालिकेत बुमराहने नेमके काय करायला हवे यासंदर्भात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने  त्याला कानमंत्र दिला आहे.
 
जसप्रीत बुमरा गेल्या काही काळापासून दुखापतींनी ग्रस्त असून त्यामुळे त्याला या दरम्यानच्या काही सामन्यांना मुकावे लागले होते. या पार्श्वभूमीवर नुकत्याच संपलेल्या आयपीएलमध्ये बुमराने पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे दाखवले असले तरी आयपीएलमधून थेट कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ दाखल झाल्यामुळे बुमरासह सगळ्यांच्याच कामगिरीकडे लक्ष असेल. अर्थात, बुमराचा अनुभव या सर्व निकषांच्या पलीकडचा असून त्याच्या याच वलयाचे साक्षीदार होण्यासाठी क्रिकेट चाहत्यांसह आजी-माजी क्रिकेटपटूही उत्सुक आहेत. सचिन तेंडुलकर हे त्यातलंच एक नाव मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दिलेल्या मुलाखतीमध्ये भारतीय संघाच्या इंग्लंडमधील कामगिरीबाबत आणि यंग ब्रिगेडच्या खेळण्याच्या पद्धतीबाबत सविस्तर भाष्य केले आहे. मात्र, त्याचवेळी सचिनलाही बुमराची गोलंदाजी बघण्याची उत्सुकता आहे. या मुलाखतीमध्ये सचिनने ती व्यक्तदेखील केली असून बुमराला इंग्लंडमधील खेळपट्ट्या व वातावरणात कशा प्रकारे प्रभावी गोलंदाजी करता येईल, याबाबत कानमंत्र दिला आहे.
 
कसोटी सामन्याच्या पहिल्या तासाभरात बुमरा गोलंदाजी करताना फक्त स्टम्प्सवर मारा करू शकतो का हे मला बघायचे आहे. त्यामुळे गोलंदाजांना त्याचे चेंडू सोडणे अशक्य होईल. कारण माझ्या अंदाजानुसार, इंग्लंडचे फलंदाज बुमराला काळजीपूर्वकच खेळतील. त्याच्या गोलंदाजीवर कोणतीही जोखीम घेण्याची चूक ते करणार नाहीत. त्यामुळे बुमराने फक्त स्टम्प्सवर मारा करायला हवा. जर फलंदाजांनी त्याचे चेंडू सोडण्याचा प्रयत्न केला, तर तिथे विकेट्स मिळण्याची शक्यता आहे, असं सचिन तेंडुलकर या मुलाखतीत म्हणाला.

Related Articles