बैलबाजारामुळे बेल्हे गावाचे अर्थकारण सुधारले   

बेल्हे, (वार्ताहर) : जुन्नर तालुक्यातील बेल्हे गावाने आपल्या परंपरागत आठवडे बैलबाजाराच्या माध्यमातून गावाचे अर्थकारण बळकट केले आहे. गेल्या काही वर्षांत या बाजाराने केवळ बैलांची खरेदी-विक्रीच नाही, तर स्थानिक रोजगारनिर्मिती, पर्यटनाला चालना दिली आहे.राज्यात प्रसिद्ध असलेला बेल्हे येथील आठवडे बैलबाजार प्रत्येक सोमवारी भरतो आणि तो परिसरातील सर्वांत मोठा बैलबाजार म्हणून ओळखला जातो. पुणे, अहिल्यानगर, नाशिक आणि ठाणे जिल्ह्यांतील शेतकरी या बाजारात बैल खरेदीसाठी गर्दी करतात. या बाजारामुळे गावात अनेक पूरक व्यवसाय उभे राहिले आहेत - लोखंडी नांगर बनवणारे कारागीर, बैलांच्या सजावटीच्या वस्तू विक्रेते, आहार व औषध पुरवठादार, तसेच वाहनचालक आणि फेरीवाले यांना चांगले उत्पन्न मिळू लागले आहे.
 
आठवडे बाजाराच्या पूर्व संध्येला दर रविवारी मिळणार्‍या बेल्हे बाजारातील आवारात पालातले मटण-भाकरी प्रसिद्ध आहे. येथे आस्वाद घेण्यासाठी राज्यातील खवय्यांची मोठी गर्दी असते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते. गावातील तरुण वर्ग आता बाजाराच्या व्यवस्थापनात, वाहतूक सेवा पुरवण्यात आणि समाज माध्यमावर प्रचार करण्यात सक्रिय सहभाग घेत आहे. यामुळे त्यांना गावातच रोजगार मिळू लागला असून स्थलांतराचा वेग कमी झाला आहे.
 
स्थानिक पंचायत आणि जिल्हा प्रशासनाने बाजाराच्या विकासासाठी रस्ते, पाण्याची सोय व शेड्स उभारणी यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. तरुण ग्रामस्थांना भविष्यात या बाजाराचा एक कृषी-पर्यटन केंद्र म्हणून विकास करण्याचा मानस आहे. बेल्हे गावाचा बैलबाजार हा केवळ व्यापाराचा केंद्रबिंदू न राहता, गावाच्या सर्वांगीण आर्थिक आणि सामाजिक विकासाचा एक महत्त्वाचा घटक ठरतो आहे. पारंपरिक बाजारपेठेच्या योग्य व्यवस्थापनातून ग्रामीण भागातही आर्थिक समृद्धी साधता येते, हे बेल्हे गावाने दाखवून दिले आहे.
 

Related Articles