हिंजवडीसह सात गावांच्या समाविष्टचे भिजत घोंगडे   

दहा वर्षांपासून सरकार दरबारी प्रस्ताव पडून

पिंपरी : पिंपरी-चिंचवडला लागून असलेल्या हिंजवडी आयटी पार्कसह, गहुंजे, सांगवडे, जांबे, मारुंजी, माण, नेरे ही सात गावे पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव गेल्या दहा वर्षांपासून राज्य सरकारकडे मंजुरीअभावी पडून आहे. हा प्रस्ताव भिजत पडल्याने त्या भागात बेसुमार अनधिकृत बांधकामे होत असून, वाहतूक कोंडीसह कचरा, पाणी, ड्रेनेज व इतर समस्या जटील बनल्या आहेत.
 
हिंजवडी आयटी पार्कमधील अभियंत्यांना हिंजवडी महापालिकेस समाविष्ट करण्यासाठी ऑनलाईन मोहीम सुरू केली आहे. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे हिंजवडीसह सात गावांचा समावेशाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या मागणीस खासदार श्रीरंग बारणे, आमदार शंकर जगताप, आमदार महेश लांडगे यांनीही पाठिंबा दर्शविला असून, तशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्या मागणीस कितपत प्रतिसाद मिळतो यांची उत्सुकता निर्माण झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच, खासदार सुप्रिया सुळे यांनीही महापालिकेस ती सात गावे समाविष्ट करण्याबाबत जाहीर वक्तव्य केले आहेत.
 
दरम्यान, शहराला लागून असलेली ही सात गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय १० फेब्रुवारी २०१५ च्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत झाला होता. राज्य शासनाच्या नगर रचना व विकास विभागाकडे ३ जून २०२५ रोजी ठराव पाठविण्यात आला. या प्रस्तावावर शासनाने अनेकदा माहिती मागविली. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून त्याबाबत नोव्हेंबर २०२० ला अभिप्राय मागविला. त्यानंतर पुढील कार्यवाही ठप्प आहे. त्याबाबत विचारणा केली असता कार्यवाही सुरू असल्याचे उत्तर राज्य सरकारकडून दिले जात असल्याचे महापालिकेचे अधिकारी सांगत आहेत.
 
पीएमआरडीएची नकारघंटा
 
पीएमआरडीएच्या आराखड्यानुसार हिंजवडी आयटी पार्कमध्ये क्लस्टर निर्माण केले जाणार आहे. त्यादृष्टीने पीएमआरडीएने नियोजन केले आहे. पीएमआरडीएने हिंजवडीसह, गहुंजे, जांबे, मारुंजी, माण, नेरे व सांगवडे ही सातही गावे पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश करण्यात स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. त्याबाबत पीएमआरडीएने राज्य शासन व विभागीय आयुक्त कार्यालयास कळविले आहे. हिंजवडीला स्वतंत्र नगरपालिका करण्याचा नवा प्रस्ताव पुढे आणण्यात आला आहे.
 
वाहतूककोंडीची समस्या गंभीर
 
पालिकेत ती सात गावे समाविष्ट केली जात नसल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. पावसात पाणी साचून अक्षरश: तळे तयार होते. त्यातून वाहनांची ये-जा करणे धोकादायक झाले आहे.
 
पिंपरी-चिंचवडमध्ये समावेशास आयटीयन्स उत्सुक
 
हिंजवडी येथील राजीव गांधी आयटी पार्क परिसरातील सध्या रस्त्यांची अत्यंत खराब अवस्था असून, सततच्या वाहतूककोंडी आणि अपुर्‍या नागरी सुविधांमुळे आयटी अभियंत्यांसह वाहनचालक व रहिवाशी त्रस्त झाले आहेत. या गंभीर समस्यांवर कायमस्वरूपी उपाय व्हावा, यासाठी वाकड-पिंपरी चिंचवड रहिवासी विकास व कल्याण संस्थेचे अध्यक्ष सचिन लोंढे यांच्या पुढाकाराने ऑनलाईन सह्यांची मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेमार्फत हिंजवडीचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश व्हावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
 
तर महापालिकेचे क्षेत्र वाढणार
 
पिंपरी-चिंचवड शहराचे क्षेत्रफळ १८१ चौरस किलोमीटर आहे. त्यात लष्कर, एमआयडीसी, पीएमआरडीए या भागांचाही समावेश आहे. या सात गावांसह दिघी व कळसचा महापालिकेत समावेश झाल्यास शहराचे एकूण क्षेत्रफळ २३७.७२ चौरस किलोमीटर इतके होणार आहे.

Related Articles