पदार्पणाच्या सामन्यात साई सुदर्शन शून्यावर बाद   

हेडिंग्ले : आयपीएल स्पर्धेत शुबमन गिलच्या जोडीने मैफिल लुटणार्‍या साई सुदर्शन याला इंग्लंड दौर्‍यावरील पहिल्याच सामन्यात पदार्पणाची संधी मिळाली. लोकेश राहुल अर्धशतकाच्या उंबरठ्यावर तंबूत परतल्यावर तो तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात उतरला. पण चार चेंडूतच तो शून्यावर बाद झाला. आयपीएलमध्ये गुजरात फ्रँचायझी संघासाठी हिरो ठरलेला हा युवा फलंदाज पदार्पणाच्या कसोटी सामन्यात खातेही उघडू शकला नाही. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर लेग स्टंपच्या बाहेर जाणार्‍या चेंडूवर बेजबाबदार फटका खेळण्याच्या नादात त्याने विकेट गमावली. मागील १४ वर्षांत पदार्पणाच्या कसोटी सामन्यात शून्यावर बाद होणारा तो पहिला फलंदाज ठरलाय. याआधी २०११ मध्ये उमेश यादव कसोटी पदार्पणा शून्यावर बाद झाला होता. 
 
नाणेफेक गमावल्यावर पहिल्यांदा फलंदाजी करताना यशस्वी जैस्वाल आणि लोकेश राहुल या सलामी जोडीनं टीम इंडियाला जबरदस्त सुरुवात करून दिली. पहिल्या सत्रातील खेळ संपण्यासाठी अवघे काही मिनिटे बाकी असताना लोकेश राहुलच्या रुपात टीम इंडियाला पहिला धक्का बसला. ९१ धावांवर भारतीय संघाने त्याची विकेट गमावली. त्यानंतर साई सुदर्शन मैदानात आला. पण पदार्पणाच्या सामन्यातील पहिल्या डावात त्याच्या पदरी भोपळा पडला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या सामन्यात शून्यावर बाद होणारा तो भारताचा २९ वा खेळाडू ठरला आहे.

Related Articles