प्रो गोविंदा लीग पुढील महिन्यात   

मुंबई : महाराष्ट्राच्या पारंपरिक संस्कृतीला आधुनिक क्रीडाविश्वाशी जोडणार्‍या प्रो गोविंदा लीगच्या तिसर्‍या सीझनची रविवारी ठाण्यात घोषणा झाली. गेल्या दोन सीझनच्या यशस्वी आयोजनानंतर यंदाही 7 ते 9 ऑगस्टदरम्यान स्पर्धेचा तिसरा सीझन पार पडणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी याची घोषणा केली. 
 
ठाण्याच्या बाबुराव सरनाईक जिम्नॅस्टिक सेंटर येथे राज्यभरातून 32 संघांनी प्रो गोविंदा लीगच्या पात्रता फेरीत सहभाग नोंदवला. यावेळी 32 संघांपैकी 16 संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. वरळीच्या एनएससीआय डोम येथे स्पर्धेची महाअंतिम फेरी रंगणार आहे. गेली दोन वर्ष अंतिम फेरी एकाच दिवसात आयोजित केली जात होती. मात्र यंदाचा गोविंदांचा सहभाग पाहता तीन दिवस हा महाअंतिम फेरीचा सोहळा रंगणार आहे.
 
पात्रता फेरीदरम्यान महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपस्थित राहून सहभागी गोविंदा पथकांचा उत्साह वाढवला.पात्रता फेरीनंतर आता येत्या 5 जुलै रोजी मुंबईत संघ लिलावाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी अधिकृतपणे संघांचे अनावरण होणार आहे. मालक आणि गोविंदा संघांची अधिकृत खरेदी प्रक्रिया यावेळी पार पडेल.
 
माझी जी मागणी होती की दहीहंडीला खेळाचा दर्जा द्यावा आणि त्या माध्यमातून आमच्या सरकारने ते मान्य केले. गेल्या तीन वर्षांपासून प्रो गोविंदा लीग आयोजित करण्यात येतेय. एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून प्रो गोविंदा लीगला मोठे सहकार्यही मिळत आहे. यापुढे आम्ही हा विचार करतोय की सर्वसामान्य मराठी जनांचा हा खेळ जागतिक स्तरावर जावा आणि खेळाचा दर्जा मिळाल्यानंतर आमच्या मुलांना नोकरी मिळावी आणि त्यांना शासनाच्या माध्यमातून सहकार्य मिळावे. 
- प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री 
 
प्रो गोविंदा लीगमध्ये 3200 गोविंदा 16 संघांच्या माध्यमातून, प्रत्येक संघात 200 जण सहभागी होणार आहेत. या माध्यमातून त्यांना फायदा व्हावा, त्यांना नोकरी मिळावी, शासनस्तरावरुन त्यांना फायदा मिळावा याचा या प्रो गोविंदाच्या माध्यमातून आम्ही विचार करतोय. त्यासाठी मेहनत घेतोय. आपल्या दहिहंडीतील गोविंदाची एक प्रतिमा तयार व्हावी, त्याला ग्लॅमर मिळावे यासाठी भव्य स्तरावर या प्रो गोविंदा लीगचे आम्ही आयोजन करत आहोत.
- पूर्वेश सरनाईक, अध्यक्ष, प्रो गोविंदा लीग

Related Articles