उजनीची वाटचाल शंभरीकडे...   

आषाढीपूर्वीच पंढरपुरात पुराचा धोका! भीमाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

सोलापूर : पुणे शहर आणि जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शुक्रवारी दौंडमधून पाण्याचा मोठा लोंढा येत असल्याने उजनी धरणातील पाण्याच्या पातळतीत झपाट्याने वाढत होत आहे. संध्याकाळी मिळालेल्या माहितीनुसार, दौंडमधून धरणात ७२ हजार क्युसेकचा विसर्ग होता.धरणातील पाण्याची पातळी 68.20 टक्के  इतकी झाली होती.येत्या दोन दिवसात उजनी शंभर टक्के भरेल असे सांगण्यात येते. 
 
पुणे जिल्ह्यात अजूनही पावसाची संततधार असल्याने तेथील सर्व धरणे भरली असून तेथून नद्यांमध्ये पाणी सोडले जात आहे.हे सर्व पाणी भीमा नदीतून दौंडमार्ग उजनीत येत आहे. उजनीवरील ताण कमी करण्यासाठी शुक्रवारी संध्याकाळ पासून ११ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग भीमा नदीत सोडण्यात आला आहे.त्यामुळे भीमा नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
 
उजनी धरणात मिसळणार्‍या दौंड विसर्गात लक्षणीय वाढ झाली असून ७० हजार क्युसेकपर्यंत वाढल्याने आषाढी वारीचा पार्श्वभूमीवर उजनी धरणाची पाणी पातळी स्थिर ठेवण्यासाठी उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्याचा निर्णय धरण व्यवस्थापनाने घेतला आहे. शुक्रवारी (२० जून ) दुपारी ३ वाजता १ हजार ६०० क्युसेक तर सायंकाळी ५ वाजता १० हजार क्युसेक असा ११ हजार ६०० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे.
 
पावसाळा आणखी चार महिने शिल्लक असल्याने पंढरपूर येथे पुढील काळात पुरस्थिती कायम राहणार आहे. दौंड येथील विसर्गात वाढ झाली असली तरी बंडगार्डन येथील विसर्ग सकाळी घटला आहे. बंडगार्डन येथून सकाळी 9 वाजता 24 हजार क्युसेक होता. रात्री 38 हजार क्युसेकपर्यंत गेला होता. सकाळी त्यात घट झाली आहे. तर खडकवासला धरणातून सोडण्यात येत असलेला विसर्ग कायम असून 15 हजार 92 क्युसेकचा विसर्ग मुळा मुठा नदी पत्रात सोडण्यात येत आहे. यंदा उजनी धरणाच्या इतिहासात पहिल्यांदाच जून महिन्यात उजनी धरणाने शंभरीच्या दिशेने वाटचाल सुरू केल्याने पूर परिस्थिती टाळण्यासाठी प्रशासनाला तातडीने पूर नियंत्रणाच्या दृष्टीने हालचाल करण्याची वेळ आली आहे. उजनी धरणात वेगाने पाणी जमा होऊ लागले आहे.
 
 

Related Articles