ट्रम्प यांना नोबेल द्या...   

पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांची मागणी 

इस्लामाबाद : भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्षबंदीसाठी भूमिका घेणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार द्यावा, अशी मागणी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी केली आहे.  
 
असीम मुनीर हे अमेरिका दौर्‍यावर असून, बुधवारी ट्रम्प यांनी त्यांना दुपारच्या जेवणासाठी आमंत्रित केले होते. ट्रम्प आणि मुनीर यांची बंद दाराआड चर्चा झाली. ट्रम्प यांनी पाकिस्तानच्या लष्करी तळांवर आणि बंदरांमध्ये प्रवेश मागितला आहे. त्या बदल्यात त्यांनी इस्लामाबादला अत्याधुनिक लष्करी तंत्रज्ञान पुरवण्याची ऑफर दिली आहे. पाकिस्तान ऐतिहासिकदृष्ट्या अमेरिकेचा भागीदार राहिला आहे. या आधी शीतयुद्ध आणि अफगाणिस्तानातील युद्धादरम्यान अमेरिकेसाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तथापि, बायडेन प्रशासनाच्या काळात अमेरिका-पाकिस्तान संबंध अत्यंत खालच्या पातळीवर पोहोचले होते. 
 
दोन्ही देशांनी इस्रायल-इराण युद्धावरही चर्चा केली. मुनीर यांनी इराण-इस्रायल युद्ध संपवण्याचे समर्थन केले आणि अमेरिकेसोबतच्या दहशतवादविरोधी भागीदारीचे कौतुक केले. दुसरीकडे, मुनीर यांना वॉशिंग्टनमध्ये निदर्शनांना सामोरे जावे लागले. अमेरिकन-पाकिस्तानी नागरिकांनी मुनीर यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.दरम्यान, पाकिस्तान आणि भारत यांच्यातील युद्ध टाळण्यासाठी ट्रम्प यांनी महत्त्वाची पावले उचलली. त्यामुळे ट्रम्प यांचा नोबेल पुरस्कार मिळावा, अशी मागणी मुनीर यांनी केली.
 

Related Articles