लाचप्रकरणी उपनिबंधकासह अधिकार्‍यावर गुन्हा   

पिंपरी : सोसायटीचे उपविधी पुस्तक (बायलॉज बुकलेट) देण्यासाठी लाच घेणार्‍या उपनिबंधकासह सहकारी अधिकार्‍यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली. दापोडीतील उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयात शुक्रवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. 
 
उपनिबंधक मुकुंद भास्कर पवार व सहकारी अधिकारी संगीता बाबुराव किरवले-चौधरी असे लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. यातील तक्रारदार यांनी त्यांच्या सोसायटीचा रजिस्ट्रेशन नोंदणीचा प्रस्ताव तयार करून किरवले यांच्याकडे दिला होता. त्यावेळी किरवले यांनी तक्रारदार यांच्याकडे ११ हजार २०० रुपयांची लाच मागितली. त्यापैकी साडेसात हजार रुपये तक्रारदाराकडून घेतले. मात्र पूर्ण रक्कम न मिळाल्याने सोसायटीचे उपविधी पुस्तक (बायलॉज बुकलेट) तक्रारदाराला दिले नव्हते. ते देण्यासाठी किरवले यांनी तक्रारदार यांच्याकडे उर्वरित ३ हजार ७०० रुपयांची मागणी केली. दरम्यान याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता, सापळा रचण्यात आला. यामध्ये ३ हजार ७०० रुपयांची लाच घेताना किरवले यांना रंगेहाथ पकडण्यात आले. उपनिबंधक मुकुंद पवार यांनी तक्रारदार यांच्याकडे केलेल्या लाच मागणीस प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे किरवले व पवार या दोघांवर दापोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles