फळ लागवडीला उष्णतेचा धोका   

मिलिंद बेंडाळे 

वाढते तपमान व हवामानबदलाचा  प्रतिकूल परिणाम उत्तराखंडमधील फळ उत्पादनांवर स्पष्टपणे दिसून येतो. गेल्या काही वर्षांमध्ये या भागात सफरचंद, नाशपाती, पीच, मनुका, लिंबू यासारख्या फळांचे उत्पादन कमी झाले आहे. वाढत्या तपमानाचा मुकाबला करण्याची ताकद कमी होत असल्याने पहाडी राज्यांमध्ये वृक्षजीवन संकटात आहे.
 
उत्तराखंडच्या अर्थव्यवस्थेत फलोत्पादनाची मोठी भूमिका आहे.  उत्तराखंडमधील बागायतदार देशाच्या फळ उत्पादनात सक्रिय योगदान देत आहेत; परंतु हवामानातील बदलांचा परिणाम त्यांच्यावरही स्पष्टपणे दिसून येतो. एके काळी नाशपाती, पीच, मनुका आणि जर्दाळूचे प्रमुख उत्पादक असलेले उत्तराखंड देशात उच्च दर्जाच्या सफरचंदांसाठीही ओळखले जाते; परंतु गेल्या काही वर्षांमध्ये या डोंगराळ राज्यात या फळांचे उत्पादन चिंताजनक पध्दतीने कमी झाले आहे. २०२० पासूनर उत्तराखंडमधीलप्रमुख फळांच्या बागायती क्षेत्रावर आणि उत्पादनावर लक्षणीय परिणाम झाला आहे. विशेषतः  समशीतोष्ण वातावरणात वाढणार्‍या फळांच्या उत्पादनात ही घट दिसून येते.
 
‘क्लायमेट सेंट्रल’ या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या  अभ्यासानुसार, तपमानवाढीमुळे अनेक प्रकारच्या फळांच्या उत्पादनामध्ये घट होत आहे.  उत्तराखंडमध्ये बागायती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट होण्याबरोबरच मुख्य फळांच्या उत्पादनातही घट दिसून येत आहे. हिमालयीन प्रदेशातील उंचावरील भागात पीच, जर्दाळू, मनुका आणि अक्रोड यांसारख्या फळांच्या उत्पादनात सर्वात मोठी घट दिसून आली आहे. त्याचप्रमाणे सफरचंद आणि लिंबाच्या उत्पादनातही पूर्वीच्या तुलनेत घट झाली आहे. 
 
२०१६-१७ मध्ये उत्तराखंडमध्ये २५,२०१.५८ हेक्टर क्षेत्रात सफरचंदाचे उत्पादन झाले होते. २०२२-२३ मध्ये ते ५५ टक्क्यांनी घटून ११,३२७.३३ हेक्टरवर आले.  या काळात सफरचंद उत्पादनात ३० टक्क्यांनी घट झाली. लिंबाच्या विविध जातींच्या उत्पादनामध्येही ५८ टक्क्यांची मोठी घट झाली आहे. पण उष्णकटिबंधीय प्रदेशात आढळणार्‍या फळांवर हवामानातील बदलांचा कमी परिणाम झाला आहे. फलोत्पादन क्षेत्रात अनुक्रमे ४९ आणि ४२ टक्क्यांनी घट झाली . आंबा आणि लिची, या दोन्ही फळांच्या उत्पादनात अनुक्रमे २० आणि २४ टक्क्यांनी घट झाली. दुसरीकडे, २०१६-१७ च्या तुलनेत २०२२-२३ मध्ये पेरूच्या उत्पादन क्षेत्रात ३६.६ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली. २०१६-१७ मध्ये हे क्षेत्र ३,४३२.६७ हेक्टर इतके होते. २०२२-२३ मध्ये ते ४,६०९.३२ हेक्टर झाले. पेरूप्रमाणेच क्रॅनबेरीच्या उत्पादनातही या काळात सुमारे ६४ टक्क्यांची लक्षणीय वाढ झाली. पेरूसाठी ही वाढ सुमारे ९५ टक्के होती. उत्तराखंडमध्ये २०१६-१७ मध्ये फळ उत्पादनाचे एकूण क्षेत्र सुमारे एक लाख ७७,३२४ हेक्टर होते, ते २०२२-२३ मध्ये ८१६९२.५८ हेक्टरवर घसरले.  २०१६-१७ मध्ये उत्तराखंडमध्ये फळांचे एकूण उत्पादन ६६२८४७.११ टन  होते. २०२२-२३ मध्ये ते ३६९४४७.३ टन इतके कमी झाले. ‘क्लायमेट सेंट्रल’च्या मते, २०१६-१७ आणि २०२२-२३ दरम्यान उत्तराखंडमध्ये फळांच्या उत्पादनात झालेली तीव्र घट विविध फळे वाढवण्याच्या पद्धतींमध्ये मोठ्या बदलांकडेदेखील निर्देश करते. गेल्या आठ वर्षांमध्ये निवडक फळांच्या उत्पादनात झालेली लक्षणीय घट शेती धोरणे, जमीनवाटप, बाजारपेठेतील परिस्थिती आणि कदाचित काही फळांवर पर्यावरणीय परिणामांमधील बदल दर्शवते. आपण जिल्हानिहाय पाहिले तर बागायती क्षेत्रात सर्वात मोठी घट टिहरीमध्ये दिसून आली. यानंतर डेहराडून येते. तथापि, दोन्ही जिल्ह्यांमध्ये फळांच्या उत्पादनात कोणतीही लक्षणीय घट दिसून आली नाही.
 
अल्मोडा, पिथोरागड आणि हरिद्वारमध्ये बागायती क्षेत्र आणि फळ उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे. उअल्मोडामध्ये फळांचे उत्पादन ८४ टक्क्यांनी कमी झाले आहे. चमोलीमध्ये २०१६-१७ ते २०२२-२३ दरम्यान बागायती क्षेत्रात फक्त १३ टक्के घट नोंदवण्यात आली; परंतु दुसरीकडे फळ उत्पादनात सुमारे ५३ टक्के घट झाली आहे. उत्तर काशी आणि रुद्रप्रयागमधील बागायती क्षेत्रात अनुक्रमे ४३ आणि २८ टक्क्यांनी घट झाली असली, तरी  फळांच्या उत्पादनात २६.५ आणि ११.७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. 
 
उष्णता, पाण्याची कमतरता आणि पावसाच्या पद्धतींमध्ये बदल यामुळे वाढत्या तपमानामुळे फळांच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो.  तपमानातील बदलांमुळे फळांमध्ये कीटक आणि रोग पसरतात. यामुळे कीटकनाशकांच्या फवारणीचा खर्च वाढतो तसेच निर्यातीवर बंधने येतात. उष्ण आणि कोरड्या हिवाळ्यामुळे उत्पादनावर परिणाम होत आहे. १९७० ते २०२२ दरम्यान उत्तराखंडचे सरासरी तापमान १.५ अंश सेल्सिअसने वाढले आहे. याचा अर्थ असा की, या काळात राज्यातील तापमानात दर वर्षी ०.०२ टक्के वाढ झाली आहे. जास्त उंची वर असलेल्या भागात ही वाढ अधिक स्पष्ट होती.
 
उष्ण हिवाळ्यामुळे उंचावरील भागात बर्फ जलद वितळत आहे. त्यामुळे बर्फाच्छादित क्षेत्रे कमी होत आहेत. गेल्या दोन दशकांमध्ये उत्तराखंडच्या उंचावरील भागात हिवाळ्यातील तपमान ०.१२ अंश सेल्सिअसने वाढले आहे. दुसरीकडे, दर दशकात ११.३ मिलीमीटर दराने पाऊस कमी झाला आहे. यामुळे, बर्फाने झाकलेले क्षेत्र सरासरी ५८.३ चौरस किलोमीटरने कमी झाले आहे. उत्तरकाशी, चमोली, पिथोरागढ, रुद्रप्रयाग या जिल्ह्यांमधील बर्फाच्छादित क्षेत्र २००० च्या तुलनेत २०२० मध्ये ९०-१०० चौरस किलोमीटरने कमी झाले आहे. 
 
तज्ज्ञांच्या मते, हिमालयाच्या उंच प्रदेशात सफरचंद, नाशपाती, पीच, मनुका, अक्रोड, जर्दाळू यासारख्या फळांच्या वाढीसाठी जास्त थंडी आणि बर्फवृष्टी खूप महत्त्वाची असते. पण पाऊस आणि बर्फाचा अभाव पर्वतीय फळांसाठी आवश्यक असलेली थंडी कमी करत आहे. त्यामुळे फळांच्या जीवनचक्रावर परिणाम होत आहे. ‘क्लायमेट सेंट्रल’च्या मते, कमी ापमानामुळे त्यांच्या पेशींना नुकसान होऊ नये म्हणून समशीतोष्ण झाडे हिवाळ्यात निष्क्रिय अवस्थेत जातात. त्याच वेळी, अतिथंडीनेही फळांचे नुकसानच होते. सफरचंदासारख्या पारंपारिक समशीतोष्ण पिकांना डिसेंबर ते मार्च दरम्यान १,२०० ते १,६०० तासांसाठी सात अंश सेल्सिअसपेक्षा कमी थंड हवेची आवश्यकता असते. गेल्या पाच ते दहा वर्षांमध्ये झालेल्या हिमवर्षावाचा विचार करता सफरचंदाच्या पिकांना दोन ते तीन पट जास्त हिमवर्षाव आवश्यक आहे.  कमी हिमवर्षाव झाल्यामुळे सफरचंदांची गुणवत्ता आणि उत्पादन कमी झाले आहे. गेल्या दोन दशकांमध्ये थंड ठिकाणी पिकवल्या जाणार्‍या फळांचे उत्पादन जवळजवळ निम्म्याने कमी झाले आहे.  उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस, पूर, गारपीट आणि भूस्खलनासारख्या आपत्तींचाही परिणाम झाला आहे. यामुळे शेतीचे आणि उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.  २०२३ मध्ये खराब हवामानामुळे ४४,८८२ हेक्टर शेतीचे नुकसान झाले होते. शेती आणि फलोत्पादनाच्या कठीण परिस्थितीमुळे उत्तराखंडसारख्या डोंगरी भागातून लोकांचे स्थलांतर वाढले आहे.  उत्तराखंडमधील काही जिल्ह्यांमध्ये शेतकरी कमी तापमानात वाढणार्‍या सफरचंदाच्या जाती निवडत आहेत.  नाशपाती, पीच, मनुका, जर्दाळूऐवजी शेतकरी किवी आणि डाळिंबासारख्या उष्णकटिबंधीय फळांची लागवड करत आहेत. कमी उंचीच्या प्रदेशात आम्रपाली आंब्याच्या जास्त घनतेच्या पिकांवरही प्रयोग करण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना जास्त फायदा झाला आहे. अल्प कालावधीत तपमानात बदल होण्याची प्रवृत्ती चिंताजनक आहे. म्हणूनच हवामानशास्त्रीय घटकांमधील, विशेषतः पिकांमधील बदल आणि त्यांच्या पद्धतींच्या संदर्भात दीर्घकालीन बदलांचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे.

Related Articles