मस्क यांच्या स्टारशिपचा चाचणीदरम्यान स्फोट   

वॉशिंग्टन : अमेरिकन उद्योगपती एलन मस्क यांच्या स्पेसएक्सच्या ‘स्टारशिप ३६’ या रॉकेटचा चाचणीदरम्यान स्फोट झाला. टेक्सासमधील मॅसी येथील स्टारबेस चाचणी स्थळी रॉकेटच्या स्थिर अग्निचाचणीदरम्यान बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. त्यावेळी रॉकेटचे इंजिन जमिनीवर चाचणीसाठी सुरू करण्यात आले होते.
 
‘स्टारशिप ३६’ ची ही शेवटची चाचणी होती, त्याचे प्रक्षेपण २९ जून रोजी होणार होते. स्थिर अग्निचाचणीमध्ये रॉकेटचे इंजिन जमिनीवर पूर्ण शक्तीने चालवले जाते, जेणेकरून प्रक्षेपणापूर्वी प्रणालीची चाचणी करता येईल. मात्र, यावेळी चाचणी अयशस्वी ठरली. स्फोटामुळे रॉकेटचे मोठे नुकसान झाले. स्टारबेस चाचणी स्थळावर अचानक मोठा स्फोट झाला. काही वेळातच संपूर्ण रॉकेट आगीच्या गोळ्यात रूपांतरित झाले. त्याच्या ज्वाळा आणि धूर दूरवर दिसत होते.अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. 
 
स्पेसएक्सने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चाचणी स्थळ रिमोट ऑपरेशनद्वारे चालवले जात असल्यामुळे आणि सर्व कर्मचारी सुरक्षित अंतरावर असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत आणि आजूबाजूच्या परिसरात राहणार्‍या नागरिकांना कोणतीही हानी झाली नाही.  नागरिकांनी चाचणी स्थळाजवळ जाऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.दरम्यान, कॅमेरॉन काउंटी शेरीफ कार्यालय आणि स्थानिक पोलिसांनीही कोणीही जखमी झाले नसल्याची पुष्टी केली आहे.
 

Related Articles