बिहारसह चार राज्यांत ईडीचे छापे   

पोलिस कॉन्स्टेबल भरती गैरव्यवहार

पाटणा : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी २०२३ मधील पोलिस कॉन्स्टेबल भरतीतील कथित आर्थिक अफरातफरीशी संबंधित प्रकरणात बिहारसह चार राज्यांत विविध ठिकाणी छापे घातले.
 
सूत्रांच्या मते, ईडीच्या पथकाने बिहारमधील पाटणा आणि नालंदा, रांची (झारखंड), लखनौ (उत्तर प्रदेश) आणि कोलकात्यामध्ये (पश्चिम बंगाल) किमान एक डझन ठिकाणी आर्थिक अफरातफर प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) छापे घातले. ही सर्व ठिकाणे एजंट, पेपर फुटीशी संबंधित टोळीचे सदस्य आणि त्यांच्या सहकार्‍यांशी संबंधित आहेत. 
 
कोलकाता येथील ज्या मुद्रणालयात परीक्षेचे पेपर छापले गेले होते तेथे देखील ईडीने छापा घातला. या कथित गैरव्यवहाराचे सूत्रधार २०२४ च्या ‘नीट यूजी’ पेपर लीक प्रकरणातील आरोपी आहेत, असेही सूत्रांनी सांगितले. बिहारमध्ये दोन वर्षांपूर्वी २१,३९१ जागांसाठी पोलिस कॉन्स्टेबल भरतीचे आयोजन करण्यात आले होते. ही परीक्षा १ ऑक्टोबर २०२३ रोजी राज्यातील ५२९ केंद्रांवर घेण्यात आली. या परीक्षेसाठी १८ लाखांहून अधिक उमेदवार होते. पेपरफुटीच्या आरोपानंतर ३ ऑक्टोबर रोजी राज्य केंद्रीय कॉन्स्टेबल निवड मंडळाने (सीएसबीसी) रद्द करण्यात आले होते. 
 

Related Articles