जीएसटी संकलनात घट   

नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा करात (जीएसटी) मागील तीन महिन्यांपासून सातत्याने घट नोंदवली जात आहे. जून महिन्यात मे महिन्याच्या तुलनेत १७ हजार कोटी आणि एप्रिल महिन्याच्या तुलनेत ५३ हजार कोटींची जीएसटी तूट झाली आहे.केंद्र सरकारला जून महिन्यात जीएसटीपोटी १.८४ लाख कोटी मिळाले. जून २०२४ च्या तुलनेत जीएसटी संकलन ६.२ टक्क्यांनी वाढले असले तरी मे महिन्याच्या तुलनेत यात घट दिसते. मे महिन्यात २.०१ लाख कोटींचे संकलन झाले होते. त्याआधी, एप्रिल महिन्यात २.३७ लाख कोटींचे विक्रमी संकलन झाले होते.
 
दरम्यान, जून महिन्यात देशांतर्गत व्यवहारातून जीएसटी संकलन ४.४ टक्क्यांनी वाढून १.३८ लाख कोटींवर पोहोचले. तर, आयात केलेल्या वस्तूंवरील महसूल ११.४ टक्क्यांनी वाढून ४५,६९० कोटींवर पोहोचले, अशी माहिती अर्थ मंत्रालयाने दिली.जूनमध्ये एकूण जीएसटीमध्ये केंद्रीय जीएसटी ३४,५५८ कोटी, राज्य जीएसटी ४३,२६८ कोटी, एकात्मिक जीएसटी ९३,२८० लाख कोटी तर उपकर अंतर्गत मिळणारे उत्पन्न १३,४९१ कोटी मिळाले.
 
एकूण परतावा याच कालावधीत २८.४ टक्क्यांनी वाढून २५,४९१ कोटी  झाला. तर, वर्षभरातील जीएसटी संकलनात ३.४ टक्के म्हणजे १.५९ लाख कोटींची वाढ झाली आहे.केंद्र सरकारने १ जुलै २०१७ रोजी देशभरात जीएसटी लागू केला.  त्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारचे १७ कर आणि १३ उपकर काढून टाकले. सध्या ५,१२, १८ आणि २८ टक्के जीएसटी आकारला जातो.
 

Related Articles