मारुती चितमपल्ली यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार   

सोलापूर, (प्रतिनिधी) : वन्यजीवाचे अभ्यासक, लेखक, साहित्यिक व वन अधिकारी अन् सोलापूरचे सुपुत्र अरण्यऋषी मारुती भुजंगराव चितमपल्ली यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता शासकीय इतमामात  अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिसांनी बंदुकीच्या हवेत तीन फैरी झाडून चितमपल्ली यांना मानवंदना  दिली. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मारुती चितमपल्ली यांचे अंत्यदर्शन घेतले. 
 
रविवारी २२ जून रोजी शहरातील रंगभवन येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ज्येष्ठ पत्रकार दशरथ वडतिले यांनी दिली. तर शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता हिराचंद नेमचंद वाचनालयामध्ये शोकसभेचे आयोजन करण्यात आले असल्याचे डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी सांगितले. चितमपल्ली यांच्या पार्थिवावर अक्कलकोट रस्त्यावरील निवासस्थानी तिरंगा ध्वज ठेवण्यात आला होता. अक्कलकोट रोड येथील निवासस्थानी संस्था संघटनेचे पदाधिकारी व राजकीय क्षेत्रातसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अंतदर्शन घेतले. 
 
अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार, ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, आमदार देवेंद्र कोठे ,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, सामाजिक वनीकरणचे अजित शिंदे, मनीषा पाटील, यांनी पुष्पचक्र अर्पण केले.
 
यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी, हिराचंद नेमचंद वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत येळेगावकर, ज्येष्ठ साहित्यिक सुहास पुजारी, कवी मारुती कटकधोंड, नरेंद्र गंभीरे, डॉ. राजशेखर शिंदे, डॉ. श्रीकांत कामतकर, वैज्ञानिक व्यंकटेश गंभीरे, निनाद शहा, सुरेश फलमारी ,दशरथ वडतिले, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, यांच्यासह अन्य मान्यवर तसेच त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक, साहित्यिक, मित्रपरिवार  उपस्थित होता.

Related Articles