माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी   

अजित पवार यांचा गौप्यस्फोट 

बारामती, (प्रतिनिधी) : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली होती, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.बारामतीत आयोजित माळेगाव कारखान्याच्या विजयासाठी झालेल्या आभार मेळाव्यात ते बोलत होते. अजित पवार म्हणाले, या निवडणुकीत मी काही बोललो नव्हतो. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ’तुम्ही मोठ्या पदावर आहात, आपण महायुतीत एकत्र आहोत, त्यामुळे तुम्ही थोडे समजून घ्या,’ हे लक्षात घेऊन मी गप्प बसलो. 
   
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष एस. एन. जगताप माझ्याकडे आले होते. त्यांनी सहा जागा मागितल्या. मी दोन जागा व एक स्वीकृत संचालक देण्याचे मान्य केले. त्यावर सहमती झाली. मात्र, नंतर पुन्हा अडचणी निर्माण केल्या गेल्या. अध्यक्षपदासाठी स्वतःचे नाव का दिले, या प्रश्नावर ते म्हणाले, माझा स्वतः अध्यक्ष होण्याचा कोणताही इरादा नव्हता. मात्र, सहा-सात लोक अध्यक्षपदासाठी इच्छुक होते. कोणी कोणाचे ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे परिस्थिती हाताळण्यासाठी माझेच नाव अध्यक्षपदासाठी पुढे करावे लागले. पुढारी माझ्या बाजूने नाहीत हे लक्षात आले. ते फक्त पद मिळेपर्यंत ’दादा दादा’ करतात. पण बारामतीचा सामान्य माणूस माझ्या पाठीशी आहे, म्हणून मी हा निर्णय घेतला, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
पाच वर्षे मीच अध्यक्ष 
   
काही लोक अफवा पसरवत आहेत की, मी थोड्याच दिवसांसाठी अध्यक्ष असेन. पण मी स्पष्ट सांगतो, पाच वर्षे मीच अध्यक्ष असेन. दरवर्षी माझ्या सहकार्‍यांपैकी पाच जणांना अध्यक्षपदासाठी तयार ठेवले आहे, त्यांची नावे वेळ आल्यावर जाहीर करणार आहे.

Related Articles