भोरमध्ये पतसंस्थेत ४० कोटीचा गैरव्यवहार   

११७ जणांविरूद्ध गुन्हा

भोर (प्रतिनीधी) : येथील नेरे विभाग नागरी सहकारी पतसंस्थेतील अध्यक्ष, संचालक, कर्जदारांनी ३९ कोटी ८७ लाख, ९७ हजार ७१७ रूपयांचा गैरव्यवहार करून ठेवीदारांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भोर पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री ११७ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. 
 
याबाबत सहकारी संस्था पुणे येथील व्दितीय विषेश लेखापरीक्षक यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. ११७ जणांमध्ये पतसंस्थेचे पदाधिकारी, संचालक आणि मोठे कर्जदार त्यामध्ये अडकले आहेत. भोर, वेल्हे तालुका, पुणे, सातारा येथील राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते, व्यापारी यांचा त्यामध्ये समावेश आहे. इतक्या मोठया प्रमाणांवर आर्थिक गैरव्यवहार, फसवणूक, बेकायदेशिर गैरव्यवहार झाल्याची ही पहिलीच घटना असल्यामुळे तालुक्यात खळबळ माजली आहे. सुमारे ४० वर्षापूर्वी या पतसंस्थेची स्थापना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिवंगत रघुनाथ किंन्द्रे यांनी केली होती. भोर, नेरे, नसरापूर, वेल्हे, धनकवडी, पुणे येथे त्याच्या शाखा कार्यरत होत्या. सर्वसामान्यांना पतसंस्थेमुळे अनेक कामात आर्थिक मदत झाली होती. पंरतु काही वर्षापूर्वी पदाधिकारी व संचालकांनी संगणमताने विनातारण जवळच्या लोकांना कर्जाचे वाटप केले. त्यामुळे नियमीत खातेदार व ठेवीदार यांना वेळेत पैसे दयायला विलंब होऊ लागला. संस्थेकडे हेलपाटे मारायला सुरवात केल्यावर सर्वच ठेवीदार जागे झाले. सर्वच शाखेत ही परीस्थिती उदभवली.कर्जदार पैसे भरायला तयार नाहीत. 
 
दरम्यान, सहकार खात्याने संस्थेवर प्रशासकाची नियुक्ती केली. काही प्रमाणांत वसुली करून सामान्य ठेवीदारांना काही प्रमाणांत पैसे दिले. मात्र किमान पाच लाख ते कमाल दिड कोटी रूपये कर्जाची थकीत रक्कम असणार्‍यावर सहकार खात्याने गुन्हे दाखल केले. 

Related Articles