वाल्मीकींच्या पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान   

वाल्हे, (वार्ताहर) :

पंढरीचा महिमा | देतां आणिक उपमा ॥

ऐसा ठाव नाही कोठे | देव उभा उभी भेटे ॥

या अभंगाप्रमाणे विठूरायाच्या दर्शनाला आतुर झालेल्या महर्षी वाल्मीकी ऋषींच्या पालखी सोहळ्याचे पुरंदर तालुक्यातील वाल्हे नगरीतून पंढरपूरकडे मोठ्या उत्साहात प्रस्थान झाले. यावेळी रामायणाचे रचनाकार महर्षी वाल्मीकी ऋषींच्या संजीवन समाधीवर सकाळी आठच्या सुमारास शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत ह.भ.प. बबन महाराज भुजबळ यांच्या हस्ते महाअभिषेक तसेच माउलींच्या जयघोषात ऋषी मंदिराला प्रदक्षिणा देखील घालण्यात आली.
 
त्यानंतर साधारण नऊच्या दरम्यान ह.भ.प. अशोक महाराज पवार यांच्या नेतृत्वाखाली वाल्मीकींच्या पालखी सोहळ्याची गावातून शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी टाळ मृदुंगाचा गजर व ज्ञानोबा माउलींच्या जयघोषाने संपूर्ण वाल्हे नगरी भक्तिसागरात चिंब झाली होती.
 
सालाबादप्रमाणे यंदाही ज्ञानोबा माउलींच्या पाठोपाठ वाल्मीकींच्या पालखी सोहळ्याचे देखील प्रस्थान झाल्याने या पालखी सोहळ्याला वाल्हे गावचे सरपंच अतुल गायकवाड, सुकलवाडीचे सरपंच संदेश पवार यांसह अमोल खवले, पोपट पवार, अमित पवार, दादासाहेब मदने, कुंडलिक पवार, रमजान आतार आदींनी सदिच्छा भेट दिली.  

वारकर्‍यांना रेनकोटचे वाटप 

जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा.दिगंबर दुर्गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुकलवाडीचे युवा सरपंच संदेश पवार यांच्या विशेष प्रयत्नातून अक्षर सृष्टी संस्थेचे अध्यक्ष सिद्धनाथ पवार यांच्या तर्फे वाल्मीकींच्या पालखी सोहळ्यातील शेकडो वारकर्‍यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. यावेळी वारकर्‍यांसह ग्रामस्थांनी देखील अक्षर सृष्टी संस्थेचे आभार मानले.
 

Related Articles