माऊलींच्या पालखीचे प्रस्थान   

अर्जुन मेदनकर

माझे जीवीचे आवडी| 
पंढरपुरा नेईन गुढी॥
पांडुरंगी मन रंगले| 
गोविंदाचे गुणी वेधले॥
 
आळंदी, (वार्ताहर) : ‘माऊली, माऊली’च्या नामघोषात आणि हजारो वारकर्‍यांच्या उपस्थितीत संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीने गुरूवारी रात्री १० वा. ४५ मिनिटांनी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवले. 
 
‘श्रीं’च्या सोहळ्याचा पहिला मुक्काम परंपरेने आळंदीतच जुना गांधीवाडा आजोळ घरी विकसित दर्शनबारी मंडपात आहे. गांधी परिवारातर्फे स्वागत, पाहुणचार पूजा व समाज आरतीनंतर सोहळा मुक्कामास विसावला. आज (शुक्रवारी) पालखी सोहळा पुण्यात दोन दिवसांच्या मुक्कामासाठी हरिनाम गजरात विसावणार आहे. देवस्थानने प्रस्थान सोहळ्याच्या थेट प्रक्षेपणाची सोय केल्याने भाविक आणि नागरिकांना मोठी पर्वणी लाभली. त्यांनी घरी राहून आनंदवारी सोहळ्याचा आनंद घेतला. 
 
प्रस्थान सोहळ्यापूर्वी परंपरांचे पालन करीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. मंदिरात पहाटे काकडा आरती, पवमान अभिषेक झाला. ‘श्रीं’च्या संजीवन समाधी दर्शनास भाविकांनी गर्दी केली होती. वीणा मंडपात परंपरनुसार कीर्तन सेवा झाली. तसेच, मंदिरात ‘श्रीं’ना महानैवेद्य झाला. त्यानंतर, सेवेकरी व सेवक यांनी सेवा रुजू केली. मंदिर परिसर व श्रींचा गाभारा प्रस्थानापूर्वी स्वच्छ करण्यात आला. सेवाभावीवृत्तीने सेवकांनी आपली सेवा रुजू केली. सोहळ्यातील इतर कार्यक्रम हरिनाम गजरात झाले.
 
प्रस्थान सोहळ्यास पुणे जिल्हा सत्र न्यायाधीश तथा आळंदी देवस्थानचे अध्यक्ष महेंद्र महाजन, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीचे प्रमुख विश्वस्त निरंजन साहेब, पालखी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त राजेंद्र उमाप, निलेश महाराज लोंढे, पुरुषोत्तम महाराज पाटील, रोहिणी पवार, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, उपव्यवस्थापक तुकाराम माने, केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार संजय जाधव, विभागीय आयुक्त,चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडा, आमदार महेश लांडगे, माजी व्यवस्थापक श्रीधर सरनाईक, पालखी सोहळ्याचे मालक राजेंद्र आरफळकर, बाळासाहेब आरफळकर, ऋषिकेश आर होळकर, श्रींच्या पालखी सोहळ्यातील मानकरी योगीराज कुर्‍हाडे पाटील, योगेश आरु, आमदार बाबाजी काळे, माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील, अश्व सेवेचे मानकरी ऊर्जितसिंह शितोळे सरकार, महादजी शितोळे सरकार, श्रींचे सेवक चोपदार रामभाऊ रंधवे, राजाभाऊ रंधवे, सोहळ्यातील वारकरी संप्रदायातील मान्यवर फडकरी, दिंडीकरी, वारकरी, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडा, मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी नियोजन केले.
 
पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या नियंत्रणात आळंदीत पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिस उपअधीक्षक डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र गौड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमा नरके, सतीश नांदुरकर, बापूसाहेब ढेरे, पोलिस नाईक मच्छिंद्र शेंडे आदींच्या माध्यमातून बंदोबस्त लावण्यात आला होता. ‘श्रीं’च्या रथापुढील आणि रथामागील मानाच्या ४७ दिंड्यांना देऊळवाड्यात परंपरेप्रमाणे चोपदार यांच्या सूचनांप्रमाणे महाद्वारातून प्रवेश देण्यात आला. दिंड्या व संबंधित दिंडी प्रमुख, वारकरी घटकांचे स्थानिक प्रतिनिधी यांना देखील प्रवेश देण्यात आला.  
 
दरम्यान, ‘श्रीं’च्या मंदिरात माउलींच्या समाधीवर ब्रह्मवृंदाच्या वतीने ‘श्रीं’ना वैभवी पोशाख झाल्यावर श्री गुरू हैबतराव बाबांच्या वतीने माउलींच्या समाधीची परंपरेने आरती हरिनाम गजरात झाली. त्यानंतर माऊली संस्थानतर्फे श्रींची आरती झाली. दरम्यान, श्रींचे वैभवी चांदीचे पादुका प्रस्थानासाठी पुष्पसजावटीने सजलेल्या चौथर्‍यावर वीणा मंडपात ठेवण्यात आल्या. श्रींचे चलपादुकांची विधिवत प्राणप्रतिष्ठापना झाली. यावेळी सोहळ्यातील नियमाप्रमाणे आळंदी संस्थानच्या वतीने मानकर्‍यांचा सन्मान करण्यात आला. तर, श्रीगुरू हैबतरावबाबांच्या वतीने दिंडी प्रमुखांना पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या हस्ते श्रीफळ प्रसाद वाटप झाले. श्रींचे संजीवन समाधी गाभार्‍यात आळंदी देवस्थानच्या वतीने परंपरेने मानकरी यांना नारळ प्रसाद देण्यात आला. त्यानंतर श्रींचे चलपादुका देवस्थानतर्फे सोहळा प्रमुख भावार्थ देखणे आणि सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांच्याकडे देण्यात आल्या.
 
मालक आरफळकर यांच्या नियंत्रणात ‘श्रीं’च्या पादुका पालखीतून मंदिर प्रदक्षिणा हरिनाम गजरात झाली. श्रींचे वैभवी चलपादुका मालकांकडे हरिनाम गजर करीत पालखीत विधिवत पूजा झाली. श्रींची पालखी आळंदीकर ग्रामस्थांनी माऊली माऊली असा जयघोष करीत खांद्यावर उचलीत वारीला जाण्यास वीणा मंडपातून रात्री उशिरा प्रस्थान ठेवले. मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर श्रींचे पादुका पालखी सोहळा आजोळघरा लगतच्या जुन्या रामवाड्याचे गांधीवाड्यात दर्शनबारी सभागृहात हरिनाम गजरात आणण्यात आला. येथे सोहळ्यातील परंपरांचे पालन करीत समाज आरतीने श्रींचा सोहळा विसावला. आळंदीत यावर्षी पहिला एक मुक्काम होत श्रींची पालखी पुढील दोन दिवसांचे मुक्कामासाठी पुण्यनगरीकडे शुक्रवारी पहाटे मार्गस्थ होईल.
 

Related Articles