पुण्यात पहाटे जोरदार; दिवसभर संततधार   

शहरात सर्वत्र पाणी; व्यवहार ठप्प; रस्ते खड्डेमय

पुणे : पुण्यात जोरदार पावसाचे सातत्य कायम आहे. गुरूवारी पहाटे शहर आणि परिसरात जोरदार पाऊस पडला. त्यानंतर दिवसभर संततधार कायम होती. त्यामुळे शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले. वाहतूक मंदावली, व्यवहार ठप्प झाले. अनेकांनी नियोजित कामे रद्द केली. नोकरदारांनी घरातूनच काम केले. अनेक रस्त्यांना वाहत्या पाण्यामुळे नाल्याचे रूप आले. पावसामुळे दिवसभर जनजीवन विस्कळीत झाले. 
 
बुधवारी रात्री सुरू झालेला पाऊस गुरूवारी पहाटे अधिक वाढला. त्यामुळे बहुतांश रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. सकाळी काही प्रमाणात पावसाची तीव्रता कमी झाली मात्र पाऊस कायम असल्याने रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. सातत्याने कोसळत असलेल्या पावसामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांची संख्या वाढली आहे. वाहत्या पाण्यामुळे वाहन चालकांना रस्ता आणि खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहतूक मंदावली होती. त्यामुळे उपनगरात सकाळी सर्वत्र वाहतूक कोंडी पाहण्यास मिळाली. पावसामुळे अनेकांनी घराबाहेर पडणे टाळले. काही भागात खासगी क्षेत्रातील कामगारांना सुट्टी जाहीर करण्यात आली. 
 
जोरदार पावसामुळे उपनगरातील बहुतांश नाले भरभरून वाहत होते. सातारा रस्ता, कर्वे रस्ता, सिंहगड रस्ता, जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता, शास्त्री रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्त्यांवरून दिवसभर पाणी वाहत होते. महात्मा फुले मंडई, तुळशीबाग, बोहरीआळी, मार्केटयार्ड, लक्ष्मी रस्त्यावरील सराफी व कापड बाजारात ग्राहकांअभावी शांतता होती. मध्य वस्तीतील चौकाचौकांत पाणी साचले होते. सायंकाळी मात्र काही मार्गावर वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे वाहतूक पोलिसांना चौकांत थांबून वाहतूक कोंडी फोडावी लागली. तर कोसळणारा पाऊस आणि वाहत्या पाण्यातून वाहन चालविताना वाहन चालकांना कसरत करावी लागली. रात्री उशीरापर्यंत पाऊस कायम होता. त्यामुळे रात्री रस्त्यांवरील वाहनांची संख्या नेहमीच्या तुलनेत कमी झाली होती. पुढील दोन दिवस शहर आणि परिसरात पाऊस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

पूरात तरूण अडकला 

धरण क्षेत्रात मुसळधार ते जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे काल खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात मुठा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. या पाण्यामुळे नदीतील पाण्याची पातळी वाढली होती. मुठा नदीपात्रात गाडीसह अडकलेल्या तरूणाची खराडी पोलिसांनी अथक प्रयत्न करून सुटका केली. अचानक नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढली. तरूणाला पाण्याचा अंदाज न आल्याने हा तरूण दुचाकीसह पाण्यात अडकला होता. तरूण आणि त्याच्या दुचाकीला पाण्यातून बाहेर काढण्यात आले. 

झाड पडल्याने विद्यार्थींनी जखमी

पावसामुळे झाड पडून त्याखाली सापडलेली विद्यार्थीनी जखमी झाली आहे. पाषाण येथील पंचवटी परिसरातील निशिगंध इमारतीसमोर ही घटना घडली. पाषाण येथील पंचवटी परिसरात एक मोठे झाड पावसात पडले. हे झाड पडून त्याखाली एक मोटार आणि दुचाकी अडकली. या घटनेत एक विद्यार्थीनी झाडाखाली सापडल्याने जखमी झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तिला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पाषाण अग्निशमन केंद्राचे अधिकारी शिवाजी मेमाणे, फायरमन जवान शशिकांत धनवटे, चंद्रकांत बुरुड, देविदास चौधरी, शुभम कारंडे, लुकमान कमलखान यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

शहरात २४ तासात पडलेला पाऊस 

ठिकाण          पाऊस
एनडीए        ८६ मिमी
पाषाण        ६४.२ मिमी
मगरपट्टा         ४९ मिमी
लोहगाव         ५२.८ मिमी
शिवाजीनगर ५४.२ मिमी
 

Related Articles